नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये नवजात बालकांचा अधिक समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात. नांदेड, छत्रपती संभाजीनगरसारख्या जिल्ह्यात इतक्या प्रमाणात रुग्ण दगावतात, त्यावर सरकारकडून प्रतिक्रिया येत नाही. संभाजीनगरात औषधे मिळत नाही, ठाण्यात रुग्णकांड होते.
यामुळे राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. संजय राऊत म्हणाले की, कळ्यातील रुग्णकांड अद्याप जनता विसरलेली नाही. राज्याच्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात हीच परिस्थिती आहे.