पुणे : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देण्यात येणार असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातून ३ गणेश मंडळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ८ हजार ७३६ सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामीण हद्दीत ३९६ एक गाव एक गणपती मंडळे आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता येईल.
शासन निर्णयातील अर्जाच्या नमुन्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे.
राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचा तपशील, निवडीचे निकष व अटी, अर्जाचा नमुना याविषयक माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा ४ जुलै २०२३ रोजीचा शासन निर्णय व ३० ऑगस्ट रोजीच्या शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही कळविण्यात आले आहे.