गाझियाबाद : उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद मधून एक दुर्दैवी घटना समोर येते आहे. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. परंतु या मुलाने घरच्यांच्या भीतीपोटी कुत्रा चावल्याचे लपवले आणि अवघ्या दीड महिन्यामध्ये रेबीजमुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधील गाझियाबादमध्ये घराच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेच्या कुत्र्याने या चौदा वर्षीय मुलाला चावा घेतला होता. त्यानंतर मुलाने घरचे रागावतील या भीतीने कुत्रा चावल्याचे घरच्यांना सांगितले नाही. त्यानंतर हळूहळू या मुलाला तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्या घरच्यांनी विचारपूस केल्यानंतर कुत्रा चावल्याचे या मुलाने सांगितले त्यानंतर घरच्यांनी त्याच्यावर उपचार देखील सुरू केले होते.
या मुलाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी शहावेजला कुत्रा चावला होता. त्यानंतर त्याला पाण्याची भीती वाटणे, कधी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढणे अशा विचित्र गोष्टी तो करत होता. घरच्यांनी त्याला विचारल्यावर त्याने कुत्रा चावल्याचे कबूल केले होते. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांना घरच्यांनी दाखवले असता त्याला रेबीजची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आणि मोठ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले होते. त्यानुसार दिल्लीतील एम्स रुग्णालयात या मुलाला नेण्यात आले परंतु हा आजार अधिक बळावला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि मुलाला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. अखेर या मुलाने ॲम्बुलन्समध्येच वडिलांच्या कुशीत आपला जीव सोडला आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनी ज्या महिलेच्या कुत्र्याने या मुलास चावा घेतल्याचे सांगितले या महिलेला देखील नोटीस बजावली आहे.