शुक्रवारी २ जून रोजी ओडिशा मधील बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Odisha train accident) कोरोमंडल एक्स्प्रेसच्या या अपघातात अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलं आहे, तर कित्येक जण जखमी आहेत. मात्र यावेळी एक मोठी घटना समोर आली आहे. मृतदेहाच्या ढिगातून एका जिवंत व्यक्तीला त्याच्या वडिलांनी शोधून काढले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात बिस्वजीत मलिक हा २४ वर्षीय तरुण देखील होता. बिस्वजीतचे वडील हेलाराम मलिक यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी २३० किमी रुग्णवाहिकेने प्रवास करत बालासोर गाठलं. अपघातानंतर मुलाला फोन लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र फोन न लागल्याने ते बालासोरला पोचले. अपघातातील जखमींना ठेवण्यात आलेल्या सर्व दवाखान्यांमध्ये त्यांनी मुलाचा शोध घेतला मात्र त्यांना मुलगा दिसला नाही. त्यावेळी हेलाराम यांना काही लोकांनी जवळच असलेल्या एका हायस्कूलमध्ये मृतदेह ठेवले असून तिथे जाऊन पाहायला सांगितले.
हेलाराम मलिक त्याठिकाणी गेले असता सुरुवातीला त्यांना आत जाऊ दिले गेले नाही. मात्र नंतर आत गेले असता त्यांना मृतदेह ठेवण्यात आलेल्या ठिकाणी एका व्यक्तीचा हात हलताना दिसला. ती व्यक्ती मुलगा बिस्वजीत असल्याचे त्यांनी ओळखले आणि तातडीने बचाव पथकाकडे धाव घेतली. त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या बिस्वजीतवर उपचार सुरु असून त्याची प्रृकृती स्थिर आहे.
रेल्वे अपघातानंतर बिस्वजीत बेशुद्ध पडला होता आणि त्यादरम्यान बचाव पथकाला त्याचा मृत्यू झाल्याचं वाटल्यानं त्यांनी त्याला मृतदेहांसोबत ठेवलं होतं. मात्र वडिलांनी आपल्या मुलाला मृतदेहांच्या ढिगाऱ्यातून जिवंत शोधून काढलं.