देशातील अनेक तरुण सरकारी अधिकारी बनण्याची स्वप्नं उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करतात. यात काहींना यश तर काहींना अपयश येतं. अपयशी झालेले काहीजण पुन्हा प्रयत्न करतात, तर काहीजण दुसरं क्षेत्र निवडतात. पण त्यातले काही मात्र शॉर्टकट मारतात. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका पठ्ठ्याने सोशल मिडियाचा वापर करून बढाया मारल्या आहेत. या तरुणाने चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आपले फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. बरं इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने आपण एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (fake IAS) आहोत अशी सुद्धा थाप मारली. हे प्रकरण सध्या बरंच गाजतंय. हा तरुण कोण आहे, त्याने असं का केलं आणि नेमकं काय घडलंय जाणून घेवूया.
अलीकडे फोटो मॉर्फ करण्याचे अनेक प्रकार घडताना दिसतात. त्यात AI सारखं तंत्रज्ञान आल्याने खरा आणि बनावट फोटोमधला फरक ओळखणंही अवघड होऊन बसलंय. अशा टेक्नॉलॉजीचा कोण कसा वापर करेल सांगता येत नाही. एका तरुणाने सुद्धा स्वतःचे फोटो मॉर्फ करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार त्याला चांगलाच महागात पडलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या जागी आपला चेहरा लावून या तरुणाने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले. आपण एक IAS अधिकारी आहोत, असं दाखवत गेल्या अनेक दिवसांपासून तो पोस्ट शेयर करत होता.
कोण आहे हा बनावट जिल्हाधिकारी? (fake IAS)
हा तरुण महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात राहणारा आहे. राहुल गिरी असं त्याचं नाव आहे. मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूरचा जिल्हाधिकारी असल्याचा तो दावा करत होता. लोकांना ते पटवून देण्यासाठी त्याने या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारतानाचे काही फोटो पोस्ट केले होते. फोटो एडिट करून स्वत:ला नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी म्हणवून घेणाऱ्या या बनावट आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
सध्या रिजू बाफना या नरसिंहपूरच्या जिल्हाधिकारी आहेत, पण राहुलने मात्र आपल्या एडिटिंग स्किल्सचा वापर करून रिजू बाफना यांच्याकडूनच पदभार स्वीकारतानाचा फोटो शेयर केला. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरलझाले. या व्हायरल झालेल्या फोटोची माहिती जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. मध्य प्रदेशातल्या जबलपूर पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली की राहुलने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मंत्र्यांसोबतचे, अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते.
जिल्हाधिकारी बनण्यासाठी ‘शॉर्टकट’
पोलिसांनी राहुलचा मोबाईल जप्त केला असता त्याच्या फोनमध्ये देखील काही अधिकाऱ्यांसह आणि राजकारण्यांसोबतचे फोटो आढळले. पण हा तरुण असं का करत असेल, यामागे त्याचा काय हेतू होता, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. राहुल गिरीला आएएस व्हायचं होतं. आएएस होणं हे त्याचं स्वप्न होतं. त्याने बीएससी केलं आहे. पण त्याला आयएएस व्हायचं होतं, मात्र त्याचं तितकं शिक्षण झालं नाही. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हा सोपा मार्ग निवडला.
एडिटिंगचे सॉफ्टवेअर वापरुन अधिकारी, राजकारण्यांसोबतचे आपले फोटो मॉर्फ करुन तो सोशल मीडियावर अपलोड करत असे. यातूनच त्याला जिल्हाधिकारी बनल्याचं समाधान वाटायचं. खरंतर त्याला उत्तम एडिटिंग येतंय म्हंटल्यावर त्याने या स्किल्सचा सदुपयोग करायला हवा होता. पण राहुलने मात्र एका सरकारी अधिकाऱ्याच्या फोटोशी छेडछाड करून स्वतःचं नुकसान करून घेतलंय.