छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाकडून एकतर्फी प्रेमाला वर्षभर सहन केल्यानंतर अखेर 15 वर्षीय विद्यार्थिनींना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीने तिच्या शाळेच्या डायरीमध्ये शिक्षकाचे नाव लिहून ठेवलं होतं. त्याचबरोबर “अम्मी मी तुला सांगू शकले नाही !” असही लिहिले आहे अशी माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी संबंधित शिक्षक अजय सासवडे याला अटक केली आहे. मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने तिचं दप्तर तपासलं. यावेळी तिच्या दप्तरांमध्ये दोन पत्र, एक घड्याळ आढळून आलं. तर तिच्या डायरीमध्ये तिने अजय सासवडे याच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दलही लिहिलं होतं. यावरूनच आता तिच्या कुटुंबीयांनी या शिक्षका विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या आरोपीस अटक केली आहे. पण या घटनेतून एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, मुलांसोबतचा संवाद पालकांकडून कमी पडतो आहे का ? पिढी दर पिढी परिस्थिती, हवामान, मानसिकता, शैक्षणिक पातळी, वैचारिक पातळी, सगळंच प्रकर्षानं बदलत राहतं. अशावेळी मुलांची सहानुभूतीने आदराने आणि विश्वास संपादन करून मैत्रीपूर्ण नातं बनवणं अत्यावश्यक असतं. त्यामुळे आपले पाल्य मानसिक रित्या खंबीर बनवण्यासाठी पालकांनी देखील त्यांच्याशी संवाद साधत राहणं अत्यावश्यक आहे.