अमरावती : अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची झाली तर आमदार बच्चू कडू यांनी एका जणांवर हात देखील उचलला असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर 24 एप्रिलला बच्चू कडू यांची सभा होणार होती. यासाठी त्यांनी पैसे देखील भरले होते. पण अचानक उद्या अमित शहा यांची या मैदानावर सभा होणार आहे. याचाच जाब विचारण्यासाठी बच्चू कडू मैदानावर गेले होते.
सायन्स कोर मैदानावर अमित शहा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. परंतु 24 तारखेला बच्चू कडू यांच्या सभेसाठी परवानगी दिली असताना अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या सभेची परवानगी रद्द करणार का ? असा अहवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना केला तसेच पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. ते म्हणाले की, पोलिसांच्या गाड्यांवर भाजपचे झेंडे लावा, तुम्ही भाजपसाठी काम करताय… असा जाब बच्चू कडू यांनी पोलिसांना विचारला आहे.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांसमोरच परवानगीच पत्र फाडलं. अमित शहांच्या सुरक्षेच कारण देऊन आमची सभा रद्द करता तुम्ही कायद्याबाबत बोलू नका. तुम्ही कायदा चुलित घातला. असं बच्चू कडू यावेळी म्हणाले. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. त्यामुळे आता उद्या अमित शहा यांच्या सभेदरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.