बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख नेते, उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी राजकीय आणि कौटुंबिक लढाई होणार आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत सभेमध्ये सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं आहे.
या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. बारामती परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पंधरा वर्षे खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्रा ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
तसेच ते म्हणाले की, या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक एका मतदार संघासाठी मर्यादित नाही. ही देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी निवडणूक आहे. प्रत्येकाचे मत आपल्याला महत्त्वाचे आहे. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या, कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.