इंदापूर : अजित पवार यांनी आज इंदापूरमध्ये प्रचारा दरम्यान केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रातून पडसाद पडायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले आहे की, ‘ सत्तेच्या पदावर राहून सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे.’
नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत
माध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत म्हणाले की, सत्तेच्या पदावर राहून सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. आमच्याही विभागात तेच चाललंय आमच्याकडे पुरावे येत असतात. नोटीस द्यायला तेच लावतात आणि मागे घ्यायलाही तेच सांगतात लोक बावळट नाही असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी महाराष्ट्रभर दौरे करून प्रचार करत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूरमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी भाषणादरम्यान ते म्हणाले की, आम्ही इंदापूरकरांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. गावचा विकास झाला पाहिजे त्यासाठी हवा तेवढा निधी देऊ. पण आमच्यासाठीही कचाकचा बटन दाबा असं अजित पवार म्हणाले आहेत.