पुणे : पुण्यामध्ये मनसेचे वसंत मोरे यांचा चांगला दबदबा होता. 18 वर्ष त्यांनी मनसेची साथ सोडली नाही. पण अखेर अंतर्गत वादविवादानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
राजीनामा दिल्यानंतर अनेक दिवस त्यांच्या या भूमिकेची चर्चा सुरू होती. त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करून वसंत मोरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असं वसंत मोरे म्हणाले. परंतु त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्याशी बोलणं टाळलं होतं. ते म्हणाले की, ” कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचे नाही. मला आग्रह करून साहेबांसोबत बोलायला लावू नका. ” असं वसंत मोरे त्यावेळी म्हणाले होते. पण आता पुन्हा एकदा ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Raj Thakrey : ” राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला ! ” राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
वसंत मोरे हे या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान असणार आहे. हे मोठ आव्हान पेलवण्यासाठी राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा वसंत मोरे यांचा असून त्यासाठीच ते आता राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे.
आतापर्यंत झालेल्या घडामोडी पाहता आता राज ठाकरे वसंत मोरे यांची भेट स्वीकारतील का ? आणि पुण्यातून त्यांना पाठिंबा देतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.