मुंबई : अनेक दिवसांच्या बैठका, भेटी, चर्चा यानंतर आज अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून विरोधक टीका करत आहेत. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी टीका करताना म्हटले आहे की, ” भाजपने राज यांना अशी कुठली फाईल दाखवली की त्यांना तात्काळ पाठिंबा जाहीर करावा लागला ? अमित शहा यांना राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात त्या मागचं कारण त्यांनी जनतेला सांगावं…! ” अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंना थेट आव्हानचं दिल आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” शरणागती यासाठी पत्करली की त्यांच्या अनेक फाईल उघडल्या गेल्या. धमक्या दिल्या म्हणून मला असं वाटतं व्यभिचार हा भाजपचा जगजाहीर आहे. अशा व्यभिचारी पार्टी बरोबर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ? महाराष्ट्राची गेल्या काही दिवसांपासून जी लूट सुरू आहे. जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देतोय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला असावा…! ” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सातत्याने महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक आणि चर्चा झाल्या. परंतु राज ठाकरेंनी आजपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. दरम्यान आज अखेर त्यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. त्यानंतर महायुतीतून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसतेय, तर विरोधक कडाडून टीका करत आहेत.