मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळं वळण घेत आहे. महायुती मधून जागा वाटपाचा पेच सुटत आला असला तरी तो वर वर दिसून येतो आहे. सुटलेला पेच अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
महायुतीमध्ये सत्तेत भाजप समवेत शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाला. यानंतर कोणाला कुठून उमेदवारी दिली जावी यासह कोणत्या प्रमुख घटक पक्षाला उमेदवारी दिली जावी यावर बरेच दिवस खलबती सुरू होत्या. अनेक जागांवर भक्कम उमेदवार देण्यात आले आहेत. पण हिंगोली आणि यवतमाळ मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नामुष्की ओढावण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली होती. पण आता भाजपच्या दबावामुळे हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची उमेदवारी मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवीन वादाला सुरुवात होणार आहे. एवढेच नाही तर हातकणंगले मधून धैर्यशील माने यांच्या देखील उमेदवारीला भाजपचा मोठा विरोध आहे. या सर्व नाराजी नाट्याचा परिणाम आता पुढे महायुतीच्या एकंदरीत परफॉर्मन्सवर कसा होतो हे येणारा काळ स्पष्ट करेलच…