नवी दिल्ली : आज मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray दिल्लीमध्ये आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांच्या भेटी झाल्यानंतर आता राज ठाकरे हे युतीमध्ये सामील होणार का ? अशा चर्चा रंगत होत्या. पण आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे थेट दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे आता या चर्चेला हवा मिळाली आहे.
सायंकाळी राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. आज अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वी ते विनोद तावडे यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती समजते आहे. काही राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे युतीमध्ये सामील झाले आहे असे स्पष्ट संकेत आहेत.
दरम्यान आज सकाळी अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु अद्याप तरी ही भेट झालेली नाही. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. आणि या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली असल्याचे समजते. परंतु नेमकी चर्चा काय झाली हे समजू शकले नाही. काही वेळातच हे दोघेजण अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आता राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाल्यामुळे ते महायुतीत सामील होणार का ? जर राज ठाकरे महायुतीत सामील झाले तर त्यांना कोणत्या आणि किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.