नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचे उमेदवार केव्हा निश्चित होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतच. दरम्यान आता जागा वाटपाबाबत लवकरच घोषणा होऊ शकते अशा शक्यता आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा केली होती आणि त्यानंतर अंतिम निर्णय हा दिल्लीतच होईल हे देखील स्पष्ट झालं होतं. दरम्यान काल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी तडकाफडकी बोलवण्यात आलं होतं. यावरूनच आता जागा वाटपाबाबत लवकरच घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागा वाटपाचा तिढा बऱ्यापैकी सुटला असून कोणाच्या पारड्यात किती जागा येणार हे गणित देखील सुटले आहे. यामध्ये भाजपला 34 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला दहा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळू शकतात अशी माहिती मिळते आहे. या समीकरणाबाबत देखील लवकरच जाहीर घोषणा होऊ शकते.