नाशिक : राज ठाकरे Raj Thackeray यांनी यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा MNS 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला. काल नाशिक मधील प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते महापूजेच आयोजन करण्यात आलं होतं. यासह राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये सध्याच्या राजकारणाबाबत जोरदार फटाकेबाजी केली आहे.
https://www.facebook.com/share/v/sHu4Me9XA1XU9XaG/?mibextid=qi2Omg
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सध्याचे राजकारण, नरेंद्र मोदी यांचे यश, सोशल मीडिया अशा अनेक विषयांवर आपल्या खास शैलीमध्ये भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, ” सध्या राजकारणात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवतायेत. मला माझ्याकडेवर माझी पोर खेळवायची आहेत. गेल्या 18 वर्षात अनेक चढ उतार आले आहेत. या चढ उतारात आपण माझ्यासोबत आहात हे समाधान आहे. यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे. ” अस आश्वासन यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना राज ठाकरे यांनी दिलं.
नरेंद्र मोदी आणि भाजपच्या परिश्रमाचे केलं कौतुक
यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केल आहे. राज ठाकरे म्हणाले की, ” नरेंद्र मोदींचे यश तुम्ही 2014 पासून पाहत आहात. पण त्यासाठी अनेक लोकांनी परिश्रम घेतले आहेत. 1952 सालापासून झटणाऱ्या खस्ता खाणाऱ्यांचे यश म्हणजे 2014 आहे. ” असं राज ठाकरे म्हणाले.
त्याचबरोबर ” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त इतिहास सांगणार आवश्यक आहे. वडा टाकला की तळून आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेव्हलला गेल्या आहेत. राजकारणात टिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंस. ” असा मोलाचा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे –
- राजकारणासाठी सोशल मीडियाचा कसा वापर केला गेला पाहिजे हे कळायला हवे. एक खूप शक्तीशाली माध्यम तुमच्याकडे आहे. सोशल मीडियाचा वापर कार्यकर्त्यांनी केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. माझेही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. मी गाडीतून खाली उतरलो की मागे गाणं ‘आराररारा..आरारं..रारा’ वाजतं. याचा अर्थ काय असतो. असं काही लोक काहीही पाहत नाहीत.
- सोशल मीडियाचा वापर प्रभावी करा. लोकांना त्यातून माहिती मिळाली पाहिजे फक्त दणदणीत संगीत, रुबाबदार चाल वगैरेने फक्त मनोरंजन होईल. आपण राजकारण-समाजकारणात आहोत. म्हणून मी श्री. केतन जोशी ह्यांची ‘सोशल मीडिया’ मार्गदर्शन शिबिरं आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी आयोजित करणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे त्यांनी तिथे यावं.
- राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात श्री. मोदींचं श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे.
- मी आत्मविश्वासाने सांगतो मी यश खेचून आणणार. आजकाल सध्या पक्षांतराचा ट्रेंड आहे. पण दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत.
- महाराष्ट्रात तीनच पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. तुम्ही म्हणाल ह्यादरम्यान राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला… पण निवडून येणाऱ्या लोकांची मोळी होती. त्यामुळे एक जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच पक्ष तळागाळातून निर्माण झाले. आणि त्यात विशेष ह्या पक्षातील कार्यकर्ते ९९% सर्वसामान्य घरातील होते.
- माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. जे जे निवडून येतात त्यांची मोळी सोबत घेतात आणि हा माझा पक्ष आहे असं सांगतात. शरद पवार नेहमी हेच करत आलेत. आता वेगळे झाले तेही निवडून येणारेच आहेत
- आम्ही वारंवार सिद्ध करून दाखवलं, समर्पक उत्तरं दिली तरी मुख्य माध्यमांमधून ‘आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो’ हा अपप्रचार केला गेला. पण मग शिवस्मारकाचं काय झालं? त्रासदायक भोंगे बंदी होणार होती त्याचं काय झालं?
- त्रासदायक भोंगे आंदोलनात उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७००० सहकाऱ्यांवर खटले भरले. असा काय गुन्हा होता त्या मुलांचा? आता कोणताच नेता त्याबद्दल बोलत नाही. माझं सरकार येऊ दे… त्रासदायक भोंगे बंद करून टाकेन.
- महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरतोय… राजकारणाचा इतका विचका झाला आहे की, माय-माता समोर येतात, मायेने डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात “बाबा रे, विश्वास आता तुझ्यावरच आहे.
- मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरु आहे. मी जरांगे-पाटील ह्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर सांगितलं होतं… आरक्षण मिळणार नाही. ह्याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे.
- राज्यात जी मराठा आरक्षणावरून जी आश्वासनं दिली जातात ती सर्व खोटी आहेत. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. पण केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी असलेल्या जातींना आरक्षण द्यावं लागेल, जे नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल…
- माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी कुणालाही जातीने पाहू नये, जातीवरून भेद करू नये. मला ते चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं ? आपण शिवछत्रपतींचं नाव घेतो ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं स्वराज्य उभं केलं.