मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील अद्याप देखील आपल्या मागणीवर ठाम आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले आहे. परंतु ते मान्य नसल्याचं जरांगे यांनी सांगून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सर्व नोंदी सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि राज्यातील सर्व केसेस विनाअट मागे घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान अजय महाराज बारस्कर Ajay Baraskar Maharaj यांनी जरांगे पाटील यांच्या या उपोषणावरच आता गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बारस्कर महाराज यांचा अपमान केला. यानंतर वारसदार महाराज यांनी आता जरांगे पाटील यांच्याविरोधी भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले अजय महाराज बारस्कर
यावेळी अजय महाराज बारस्कर म्हणाले की, ” मी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मराठवाड्यात ओबीसी नोंदसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो होतो. जरांगे पाटील हे हेकेखोर आहेत. कोणत्याही शब्दावर अडून राहायचं, पाटील पदासाठी त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे मी त्यांना पाटील म्हणणार नाही. सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मी मसुदा समजवायचो. मी त्यांच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे. मनोज जरांगे यांना 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसण्याआधी एक चर्चा झाली. योगायोगाने मी सुद्धा या मिटींगला उपस्थित होतो. यावेळी सर्व ग्रामस्थांनी जरांगे यांना आपण आत्ताच आलो आहोत. लगेचच उपोषणाला का सुरुवात करायची ? 16 नंतर उपोषणाला बसुयात.. असे म्हंटले असताना, जरांगे यांना एक फोन आला होता त्यानंतर जरांगे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मी आता उपोषणाला बसलो आहे. पुढचं बोला असं पत्रकारांना सांगितले. यावेळी लोकांनी आपलं ठरलं नाही. उपोषणाला कसे बसतात ? असा प्रश्न देखील केला असल्याचं महाराजांनी सांगितलं. दरम्यान कोणाचा फोन आला होता ? हे जरांगे यांनी सांगावं असा सवाल अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांना केला आहे.