जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (10 फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये धडक देऊन अखेर राज्य सरकारला अध्यादेश काढण्यास भागच पाडले. जरांगे पाटील यांच्यासोबत भगवं वादळ मुंबई पोहोचल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अध्यादेश काढून त्यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगितलं. तर या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार जरांगे पाटील हे आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत.
यासाठी त्यांनी सरकारला 9 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. तर सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र आता जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.