एक ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष असलेले डॉ. हरी नरके (Hari Narke) यांचं बुधवारी 9 ऑगस्टला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुरोगामी चळवळीचा एक आधारस्तंभ, फुले साहित्याचे अभ्यासक, संशोधक, तसंच उत्तम वक्ते असं हरी नरकेंचं व्यक्तिमत्त्व. तर कधी आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते वादातही अडकलेत. पण पुरस्कार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्काच बसला. या ज्येष्ठ विचारवंताचा जीवनप्रवास जाणून घेवूया.
खरंतर याच आठवड्यात हरी नरकेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही अनेक दिवसांपासून ते आजारी होते. पण गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचं समजतंय. उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात 15-20 दिवस दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी नरके राजकोट इथल्या रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. पण बुधवारी मुंबईला येत असताना प्रवासात सकाळी सहा वाजता गाडीतच त्यांची प्रकृती खालावली. प्रवासात त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादारम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका पुरोगामी चळवळीला मुकला, अशी हळहळ व्यक्त केली जातेय.
कोण होते हरी नरके?
हरी नरकेंचा जन्म 1 जून 1963 साली झाला. पुणे विद्यापीठातल्या महात्मा फुले अध्यासनाचे नरके हे अध्यासन प्राध्यापक होते. तसंच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे ते सदस्यही होते. शिवाय पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. तसेच मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या भाषांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून सुद्धा हरी नरकेंनी विशेष योगदान दिलंय.
महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक अशी त्यांची ख्याती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या हे भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा सिंहाचा वाटा राहिला. ‘महात्मा फुले यांची बदनामी – एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. तशी त्यांनी आजवर 56 पुस्तकं लिहिली आहेत. एवढंच नाही तर ओबीसींच्या प्रश्नांवर सुद्धा त्यांचा विशेष अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी प्रश्नांसाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं.
फुलेंचा विचार मानणारे नरके हे दलित आणि शोषित वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही कायम पुढे असायचे. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करायचे. आता सोशल मिडियाचा काळ असल्याने ते सोशल मिडियावरही सक्रिय असायचे. फेब्रुवारी 2011 पासून ते ब्लॉग लिहायचे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला नरकेंनी आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. याशिवाय फेसबुकवही त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. फेसबुक पोस्टद्वारे ते आपली मतं मांडायचे. अगदी मृत्यूच्या काही तास आधी सुद्धा त्यांनी फेसबुकवर आपली एक मुलाखत शेयर केली होती.
फेसबुक पोस्टवरून वाद
नरके हे स्पष्ट वक्ते असल्याने कधीकधी ते वादातही यायचे. मागे एकदा फेसबुकवरच त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी आपलं मत मांडलं होतं, ज्यामुळे वाद झाला होता. मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे 37 ग्रंथ प्रकाशित झाले होते. त्यांनी लिहिलेले लेख हे अनेक वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले होते. अशा या व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नरके हे छगन भुजबळ यांचे जवळचे मित्र होते.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्याआधीच मृत्यू
खरंतर काहीच दिवासांपुर्वी हरी नरकेंना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. स्मृतिचिन्ह, मानपत्र, फुले पगडी, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरूप होतं. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं निधन म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळीची हानी असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.