साधारण 5 वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे, जेव्हा बिहारचे मोठे राजकारणी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये लालू प्रसाद यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी महाराष्ट्रातले आणि बिहारचे अनेक राजकीय नेते लालूंना भेटायला रुग्णालयात गर्दी करत होते. पण या दिवशी मात्र एका व्यक्तीशिवाय लालू कुणालाच भेटले नाहीत. त्या व्यक्तीसाठी त्यांनी हॉस्पिटलचे सर्व नियम मोडले, डॉक्टरांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. पण त्यांना भेटायला आलेली ती व्यक्ती ना राजकारणी होती, ना कोणती सेलिब्रिटी. त्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या हा मजेशीर किस्सा नक्की काय आहे.
‘गोपालगंज टू रायसीना – माय पॉलिटिकल जर्नी’ हे लालू प्रसाद यादव यांचं आत्मचरित्र आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक मनोरंजक किस्सा मात्र या पुस्तकात छापण्यात आलेला नाही. कारण हे पुस्तक प्रकाशनाला गेल्यानंतरच हा किस्सा घडला. पुढे या पुस्तकाचे सह-लेखक नलिन वर्मा यांनी घटना सांगितली. ‘द टेलिग्राफ’मध्ये ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. हे आत्मचरित्र प्रकाशनासाठी देण्यात आलं होतं. पण त्याआधी या पुस्तकातले काही तथ्य पडताळून घेण्यासाठी नलिन वर्मा हे लालू प्रसाद यांना भेटायला निघाले होते. एअरपोर्टवरून वर्मा यांनी रिक्षा केली. लालू ज्या हॉस्पिटलला होते त्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचा पत्ता वर्मांनी रिक्षावाल्याला सांगितला. हा पत्ता ऐकताच रिक्षावाल्याच्या लक्षात येतं की लालू देखील याच हॉस्पिटमध्ये दाखल आहेत.
लालू प्रसाद हे देशाच्या राजकारणातील त्यावेळचं एक मोठं नाव, त्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रियेची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पत्ता ऐकताच रिक्षावाल्याने वर्मांना चटकन विचारलं, “तुम्ही लालूप्रसाद यादव यांना ओळखता का? ते सध्या त्याच हॉस्पिटलमध्ये आहेत.” यावर वर्मा म्हणाले, “हो, मी आता त्यांनाच भेटायला चाललोय.” वर्मा यांचे हे शब्द ऐकताच मूळचा यूपीचा असलेल्या या रिक्षावाल्याने अचानक रिक्षा थांबवली आणि वर्मांना म्हणाला की “मलाही त्यांना भेटायचंय. तुम्ही मला लालूजींना भेटायला मदत करू शकता का? तुम्ही मला मदत केलीत तर मी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन.”
वर्मांना काय बोलावं हेच सुचेना. एका रिक्षावाल्याची लालूंशी ओळख तेही ते रुग्णालयात असताना.. वर्मा हे करू शकतील की नाही याची त्यांनाच खात्री नव्हती. मुळात ते त्यांचं कामच नव्हतं. पण तरी त्यांनी मी प्रयत्न करेन असं त्या रिक्षावाल्याला सांगितलं. हा रिक्षावाला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातला एक गरीब मुसलमान होता. रोजगारासाठी तो मुंबईत आला होता. लालूंना भेटण्याची त्या रिक्षावाल्याची खूपच इच्छा होती. पण एका रिक्षावाल्याची लालूंसोबत ओळख कशी करायची या विचारात वर्मा होते. त्यांना हे अशक्यच वाटत होतं. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मग त्यांनी त्याच्याकडे नाव आणि फोन नंबर मागितला आणि मी प्रयत्न करेन असं सांगितलं.
अन्सारी असं त्याचं नाव होतं. रिक्षातून उतरताना मात्र या रिक्षावाल्याने अशी गोष्ट सांगितली जी वर्मांच्या मनाला भिडली. तो म्हणाला, “मला सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि लालूजींना एकाच वेळी भेटण्याची जर संधी मिळाली तर मी लालूजींनाच भेटेन.” यानंतर अन्सारीने लिहून दिलेला नंबर वर्मांनी आपल्या खिशात ठेवला. अन्सारीने त्यांना पुन्हा विनंती केली, “लालू जी से मुझे मिलवा देना बाबू. अल्लाह मेहरबान होगा.” पण हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करताच वर्मा त्याची विनंती विसरले. लॉबीत त्यांची वाट पाहणाऱ्या लालूंच्या एका सहाय्यकाने त्यांना चौथ्या मजल्यावर असलेल्या खोलीत नेलं. काही वेळाने रुपा पब्लिकेशनचे रुद्र शर्माही तिथे पोहोचले.
लालूंची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झालेली. बीपी आणि शुगर अस्थिर. आजूबाजूला सतत डॉक्टर्स आणि नर्सचा घोळका. काय खावं आणि काय नाही ते त्यांना सांगत होते. पण त्याही अवस्थेत लालूंनी वर्मा आणि शर्मा यांच्याशी पुस्तकातल्या मुद्यांवर चर्चा केली, त्यांची विचारपूस केली. मध्येच डॉक्टर आणि नर्स त्यांचं बीपी आणि शुगर तपासायला यायचे. काहींनी तर त्यांच्यासोबत फोटोही काढले. यादरम्यान लालूंच्या हरियाणातील एका नातवानेही फोन करून दोन-तीन मिनिटं त्यांच्याशी संवाद साधला. डॉक्टर आणि नर्स तर लालूंना आपल्या आजोबांसारखंच वागवत होते. तर लालू सुद्धा त्यांच्याशी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे बोलत होते.
यावेळी एका नर्सला लालू म्हणाले की “तुम्ही आता लग्न करायला हवं, उशीर करू नका. तुम्ही तुमच्या आई-वडिलांची आणि कुटुंबातल्या इतर वयस्करांची काळजी घ्यायला हवी”. यावर ती नर्स लाजून हसली. या सगळ्या वातावरणात संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वर्मा निघण्याच्या तयारीला लागले असता त्यांना त्या रिक्षावाल्या अन्सारीची आठवण आली. मग त्यांनी लालूजींना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी बिहार आणि महाराष्ट्रातील काही बडे नेते लालूंना भेटण्यासाठी बाहेर वाट पाहत बसले होते. तर लालू मात्र रिक्षावाल्याची इच्छा ऐकून अस्वस्थ झालेले.
लालूंनी आलेल्या सर्व नेतेमंडळींना नंतर भेटायला यायला सांगितलं आणि अन्सारीचा नंबर घेऊन स्वतः त्याला भेटायला बोलावलं. “आप का नाम क्या हैं? आप जल्दी हम से मिलने आ जाओ. ढाई सौ ग्राम कच्चा कलेजी भी लेके आना. आज बकरी ईद का दिन है. कुर्बानी वाला कलेजी लाना”, अशी इच्छाही अन्सारीला सांगितली. फोन ठेवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर अन्सारी तिथे पोहोचला. त्याच्या हातातल्या एका पांढऱ्या रुमालात कलेजी होती. तर डोळ्यात अश्रु तरळत होते. तिथेच शेजारी लालूंचे सहकारी लक्ष्मण उभे होते. लालू अन्सारीला म्हणाले- “रडू नकोस. लक्ष्मणसोबत जा आणि मोहरीचं तेल, आलं, हिरवी मिरची, काळी मिरी आणि मीठ घालून शिजवलेली कलेजी आणा. मग एकत्रच जेवूया.”
लक्ष्मण अन्सारीला त्याच खोलीच्या शेजारी असलेल्या स्पेशल किचनमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटल प्रशासनाने लालूंसाठीच या किचनची विशेष व्यवस्था केली होती. थोड्या वेळाने लक्ष्मण आणि अन्सारी एका ताटात शिजवलेलं मटण घेऊन आले. लालूंनी पलंगावर बसून अन्सारीला आपल्या ताटात जेवायला बोलावलं. पण अन्सारी म्हणाला “हुजूर आपकी प्लेट में मैं कैसे खाऊं. मैं गरीब आदमी हूं. ऑटोरिक्शा चलाता हूं. आपसे मिल लिया, मुझे सबकुछ मिल गया”. लालूंनी त्याला प्रेमाने फटकारलं, “चुपचाप आकर साथ में खाओ नहीं तो दो थप्पड़ मारूंगा.” मग मात्र अन्सारीला यावंच लागलं.
दोघे एका ताटात जेवू लागले. तेवढ्यात तिथे एक नर्स आली आणि लालूंना अडवू लागली- “तुम्ही मटण का खाताय? डॉक्टरांनी तुम्हाला मटण खायला सक्त मनाई केली होती ना?” त्यावर लालू हसले आणि म्हणाले “डॉक्टर साहब भोले हैं. उनको पता नहीं कि अंसारी के मीट में जितना फायदा है उतना फायदा पूरे अस्पताल की दवाई में नहीं. ये कुर्बानी का मीट है.” त्यानंतर ते लेखकांकडे वळून म्हणाले, ‘मला गरिबांकडून खूप प्रेम मिळालं. आणखी काय हवे? मी मरण आणि आजारपण दोन्हीचाही विचार करत नाही. आपलं आयुष्य तर देवाच्या हातात आहे.
जेवण झाल्यानंतर लालू अन्सारीला म्हणाले, “अन्सारी आता जा. काही अडचण असेल तर सांगा, पुन्हा भेटू”. भावूक झालेला अन्सारी लालूंचा निरोप घेताना “या अल्लाह, लालूजी को आबाद रख” असं म्हणून निघून गेला. मग लालू वर्मा आणि इतरांना म्हणाले की आता 8 वाजले आहेत. कलेजी चार-पाच जणांना पुरणारी नसल्याने मी तुम्हाला आग्रह केला नाही. पण तुम्ही आता हॉटेलमध्ये जा, चांगलं खा-प्या. बिहारमध्ये तर दारूबंदी आहे.”