Amit Shah Speech: संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मणिपूरबाबत पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार खडागंजी रंगली. यावेळी गृहमंत्री अमित शहा अखेर मणिपूर प्रकरणावर खुलेपणाने बोलले. शाह यांनी हिंसाचारामागील कारणेही स्पष्ट केलीत. मणिपूरवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभागृहात बराच वेळ गदारोळ केला.
लोकसभेत बुधवारी अविश्वास ठरावावर जोरदार चर्चा सुरू असताना खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चांगलंच घेरलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचारावरील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला.यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “मी मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी तयार आहे.पण त्यांना चर्चा नको आहे. त्यांना फक्त निषेध करायचा आहे. जर ते माझ्या चर्चेने समाधानी नसतील तर पंतप्रधानही निवेदन देण्याचा विचार करतील.” यापुढे बोलताना ते म्हणाले की,”तुम्हाला असं वाटतंय की, गोंधळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल. मला गप्प करू शकत नाही. देशातील जनतेचा पाठिंबा आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसक घटनेबद्दल मी सविस्तर बोलेन. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा नंगा नाच झाला आहे. अशी घटना कोणीही मान्य करू शकत नाही. ही घटना लज्जास्पद आहे.”
आणखी काय म्हणाले अमित शहा?
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “मला देशाला सांगायचे आहे की देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे ४ वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता उठवले आणि हे सांगतात की मोदीजीना काळजी नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केलंय. १६ व्हिडीओ कॉन्फरन्स केल्या, ३६००० जवान पाठवले. मुख्य सचिव बदलले, डीजीपी बदलले. सुरक्षा सल्लागार पाठवले गेले.” यापुढे बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री मदत करत आहेत.भारत सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना पाठवले. 3 तारखेला हिंसाचार झाला आणि 4 तारखेला सर्व काही संपले. ते प्रश्न करतात की 356 (राष्ट्रपती राजवट) का लागू करण्यात आली नाही. राज्यात सत्तेत असताना 356 लागू केली जाते. आम्ही केलेले बदल राज्य सरकारने मान्य केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळाली नसती तेव्हा त्यांना बदलावे लागले असते.पण ते मुख्यमंत्री मदत करत आहेत.”
“पंतप्रधानही विचार करतात, पण…”
अमित शाह म्हणाले, “पंतप्रधानही चर्चेचा विचार करतात, पण जेव्हा गृहमंत्र्यांना बोलू दिले जात नाही तर त्यांना तरी काय चर्चा करू देतील? तुम्हाला चर्चा करायची नाही, तुम्हाला फक्त आरोप करायचे आहेत. मणिपूरमध्ये सहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, पण तेथे संचारबंदी लागू करण्यात आली नाही.”
मैतेई व कुकी समाजाला आवाहन
शांततेचे आवाहन करताना गृहमंत्री म्हणाले, “मी मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना संवाद साधण्याचं आवाहन करतो, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. मी तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही राज्यात शांतता प्रस्थापित करू. पण राजकारण करू नये.”
व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाले?
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढलेल्या व्हायरल व्हिडीओवर अमित शाह म्हणाले, “हा व्हिडीओ संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी का आला? जर कोणाकडे हा व्हिडीओ असेल तर त्यांनी तो डीजीपीला द्यायला हवा होता आणि त्याच दिवशी कारवाई झाली असती. ज्या दिवशी आम्हाला व्हिडीओ मिळाला त्या दिवशी आम्ही त्या सर्व ९ लोकांना शोधून काढले आणि त्यांना अटक केली. मी तेथे 3 दिवस राहिलो आणि या काळात आम्ही अनेक निर्णय घेतले. निमलष्करी दल तैनात करण्यात आले.