गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूर (Manipur News) राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळात देखील मणिपूर हिंसाचाराचे (Manipur Violence) पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता भाजपविरोधी पक्षांची युती असलेल्या इंडियाने (INDIA) मणिपूर दौरा करण्याचे ठरविले आहे.
मणिपूर घटनेवरून आधीच विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत भाष्य करावं, विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, अशी मागणी विरोधक करत होते. इतकंच नाही तर इंडियाने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव देखील दाखल केला. यानंतर आता विरोधी पक्षांचे खासदार दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. 29 व 30 जुलै असा हा दौरा असणार आहे. मणिपूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मणिपूर परिस्थितीचा घेणार आढावा (Manipur Violence)
विरोधी पक्षाच्या आघाडीतून मणिपूरला जाणाऱ्यांमध्ये एकूण 21 खासदारांचा समावेश असल्याचं समजतंय. काँग्रेस खासदार गौरव गोगोई हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. तर महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत हे देखील मणिपूर दौरा करणार आहेत. या दौऱ्याविषयी गोगोई म्हणाले की, पुढील आठवड्यात संसदेत आम्हाला मणिपूरच्या लोकांच्या समस्या मांडायच्या आहेत. त्यासाठी आम्ही तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत.
‘या’ खासदारांचा शिष्टमंडळात समावेश
मणिपूर दौऱ्यावर असलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई आणि फुलोदेवी नेताम, तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, जनता दल युनायटेडचे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि अनिल हेगडे, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहम्मद फैजल, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, व्हीसीके पक्षाचे टी थिरुमावलावन, द्रमुकच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कनिमोजी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, माकपचे ए. ए. रहीम, सपाचे जवाद अली खान आणि आपचे सुशील गुप्ता या नेत्यांचा समावेश आहे.