जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अमेरिकेचा आज (4 जुलै) स्वातंत्र्य दिवस (USA Independence Day) आहे. अमेरिकेला जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हटले जाते. आज इतका मोठा आणि शक्तिशाली देश असलेला हा देश एकेकाळी पारतंत्र्यात होता, असं सांगितलं तर कोणाला लवकर विश्वास बसणार नाही. आता जगावर राज्य करणारी अमेरिका ही फार वर्षांपूर्वी ब्रिटनच्या अधिपत्याखाली होती. पण 4 जुलै 1776 रोजी मात्र अमेरिकेने ब्रिटनपासून सुटका करून घेतली आणि स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले.
दरवर्षी अमेरिका आपला स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करते. या दिनानिमित्त परेड, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. अमेरिकन लोक या दिवशी लाल, निळे, पांढरे अशा रंगाचे कपडे परिधान करतात. तसंच बार्बेक्यूचे आयोजन केले जाते. ज्यावेळी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हवेत गोळ्या झाडून सलामी देण्यात आली आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी फटाके फोडण्याची प्रथा सुरू झाली. पण सर्वात जुनी लोकशाही असलेल्या या देशाच्या स्वातंत्र्यदिनाशी संबंधित काही अजब आणि विशेष बाब आहेत. त्याविषयी जाणून घेऊयात.
- 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. याच दिवशी अमेरिकेसाठी ऐतिहासिक असलेला स्वातंत्र्याचा जाहिरनामा (Declaration of Independence) स्विकारण्यात आला. विशेष म्हणजे या दिवशी केवळ दोनच लोकांनी या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. नंतर महिन्याभराने म्हणजे 2 ऑगस्ट 1776 रोजी खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर सर्वांनी स्वाक्षरी केली. पण तरी देखील 4 जुलै हाच दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस म्हणुन साजरा केला जातो.
- दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या पहिल्या पाच राष्ट्राध्यक्षांपैकी तिघांचा मृत्यू हा याच तारखेला म्हणजेच 4 जुलैला झाला आहे. 1976 साली स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर सही करणारे जॉन अॅडम्स आणि थॉमस जेफरसन यांचे एकाच दिवशी म्हणजे 4 जुलै 1826 रोजी निधन झाले. या दोघांच्या मृत्यूमध्ये केवळ काही तासांचं अंतर होतं. त्यावेळी अॅडम्स हे 90 तर जेफरसन हे 83 वर्षांचे होते. यानंतर या तारखेला तिसरा मृत्यू झाला तो राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांचा, जे अमेरिकेचे पाचवे अध्यक्ष होते. 4 जुलै 1831 रोजी न्यूयॉर्क शहरात वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
- अमेरिकेचे पहिले सात राष्ट्राध्यक्ष (वॉशिंग्टन, अॅडम्स, जेफरसन, मॅडिसन, मोनरो, अॅडम्स, जॅक्सन) अमेरिकेत जन्मला आलेले नव्हते. त्यांचा जन्म हा इंग्रजी वसाहतीत झाला होता. अमेरिकेत जन्मलेले पहिले अध्यक्ष मार्टिन व्हॅन बुरेन होते.
- अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांचा जन्म देखील 4 जुलै 1872 रोजी झाला.
- फिलीपिन्स देश दरवर्षी 4 जुलै रोजी युनायटेड स्टेट्ससोबतच्या त्यांच्या ऐतिहासिक युतीच्या स्मरणार्थ ‘फिलिपिनो-अमेरिकन फ्रेंडशिप डे’ पाळतात. याच दिवशी फिलीपिन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले होते.
- याशिवाय 4 जुलैचं आणखी एक विशेष म्हणजे या दिवशी हॉट डॉग खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. नॅथन ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी दरवर्षी 4 जुलैला या स्पर्धेचं आयोजन करते.
अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा (USA Independence movement)
सुरुवातीला युरोपियन देशांना अमेरिका हा देश माहित नव्हता. ख्रिस्तोफर कोलंबस यांना अमेरिकेचा शोध लागल्यानंतर युरोपियन लोक इथे स्थलांतरित झाले. मात्र यामुळे अमेरिकेचे मूळचे रहिवासी म्हणजेच रेड इंडियन्स यांचं प्राबल्य कमी कमी होऊ लागलं. पुढे ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात इथल्या जागेवर ताबा मिळवला, ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्य विस्तारू लागलं.
ब्रिटिश सरकारने अमेरिकेत अनेक कठोर कायदे केले ज्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकन लोकांनी संघर्ष केला. त्यांनतर आजच्याच दिवशी 1776 मध्ये अमेरिकेतील 13 वसाहतींनी एकत्र येऊन आपले स्वातंत्र्य घोषित केले. सध्या अमेरिका हा आर्थिक आणि लष्करी दृष्टीने एक बलाढ्य देश आहे.