भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत फक्त ‘बिझनेसमन’च येतात असं ना ही, देशातले अनेक आमदार सुद्धा ‘कोट्यवधीश’ (India’s Richest and Poorest MLAs) आहेत. सध्या देशातल्या आमदारांची संख्या 4 हजारांहून अधिक असून त्यापैकी बहुसंख्य आमदारांकडे अब्जावधींची संपत्ती आहे. ADR या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालं आहे. या सर्व आमदारांची संपत्ती एकत्र केली तर ईशान्येकडच्या 3 राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही ती जास्त आहे. याशिवाय भारतात काही गरीब आमदार असल्याचं देखील उघड झालं आहे. एका आमदाराकडे फक्त सतराशे रुपये इतकीच संपत्ती आहे. जाणून घेऊया कोणत्या पक्षाच्या आमदाराकडे सर्वात जास्त संपत्ती आहे आणि कोणाकडे सर्वात कमी संपत्ती आहे?
एकीकडे देशात महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न आहेत, तर दुसरीकडे श्रीमंत आमदारांची यादी बाहेर आल्याने अनेकांच्या भुवयाच उंचावल्या आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ADR या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, देशातल्या सर्व आमदारांची एकूण संपत्ती सुमारे 55 हजार कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे हा आकडा नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यांच्या यंदाच्या म्हणजेच 2023-24 च्या एकत्रित वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा देखील जास्त आहे. या तीनही राज्यांचं एकूण बजेट 49 हजार 103 कोटी रुपये इतकं आहे. तर त्याहून देशातल्या 4 हजार विद्यमान आमदारांकडे एकूण 54 हजार 545 कोटींची संपत्ती आहे.
भाजप व काँग्रेसचे आमदार सर्वाधिक धनवान
भाजप आणि काँग्रेस हे देशातले दोन मोठे पक्ष असून या पक्षात 2 हजाराहून जास्त आमदार आहेत. त्यांची संपत्तीही बरीच आहे. या अहवालात 84 राजकीय पक्षांचे 4,001 विद्यमान आमदार आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. या अहवालातली एक विशेष बाब म्हणजे आमदारांच्या संख्याबळामध्ये काँग्रेसपेक्षा भाजप आमदारांची संख्या अधिक आहे. मात्र, संपत्तीच्या बाबतीत काँग्रेसचे आमदारही भाजपपेक्षा कमी नाहीत. देशात भाजपचे 1 हजार 356 आमदार असून त्यांची एकूण संपत्ती 16 हजार 234 कोटी इतकी आहे. तर काँग्रेसचे 719 आमदार असून त्यांची संपत्ती 15 हजार 798 कोटी आहे. म्हणजेच भाजपच्या आमदारांची संख्या दुप्पट असली तरी श्रीमंतीमध्ये कॉंग्रेस काहीशा फरकानेच मागे आहे.
देशातील सर्वात श्रीमंत आमदार (India’s richest MLAs)
ADR च्या अहवालानुसार, एकट्या कर्नाटकात 223 पैकी 32 आमदार हे अब्जाधीश आहेत. त्यानंतर आंधप्रदेशात 174 पैकी 10 आमदार अब्जाधीश आहेत. तर अरुणाचल प्रदेशमधील 59 पैकी 4 आमदार अब्जाधीश आहेत. शिवाय महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेशातही 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले आमदार आहेत. देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 1 हजार 413 कोटी रुपये इतकी असून ते भारतातले सर्वात श्रीमंत आमदार आहेत.
अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा हे 1 हजार 267 कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत आमदारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर कॉंग्रेसमध्ये सर्वात तरुण असलेल्या आमदारांचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. हे तिसरे आमदार म्हणजे कर्नाटक विधानसभेतले काँग्रेसचे प्रियकृष्ण, ज्यांचं वय 39 वर्षे असून त्यांच्याकडे 1,156 कोटींची संपत्ती आहे. शिवाय प्रियकृष्ण यांच्या वडीलांचा सुद्धा या यादीत समावेश आहे. एम. कृष्णप्पा कर्नाटकातल्या अब्जाधीशांच्या यादीत 18 व्या स्थानावर आहेत.
श्रीमंतांच्या यादीत महाराष्ट्रातील आमदारांचाही समावेश
महाराष्ट्रातल्या 284 आमदारांची सरासरी संपत्ती ही 23.51 कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांपैकी भाजपचे आमदार पराग शहा यांची संपत्ती 500 कोटी रुपये इतकी असून ते या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. तर दहाव्या क्रमांकावर असणारे मंगलप्रभात लोढा हे देखील भाजपचे आमदार असून त्यांची एकूण संपत्ती 441 कोटी आहे.
सर्वात गरीब आमदार (India’s poorest MLAs)
तसेच देशात सर्वात गरीब आमदार सुद्धा आहेत, ज्यांची संपत्ती केवळ 1,700 रुपये आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार निर्मल कुमार धारा हे सर्वात गरीब आमदार आहेत. निर्मल कुमार यांच्याकडे कोणतीही जमा, गुंतवणूक किंवा सेविंग्स नाहीय. त्यांच्या नावावर कोणताही विमा किंवा इतर कोणतीही पॉलिसी नसल्याची माहिती आहे. याशिवाय ओडिशातील रायगडाचे आमदार मकरंदा मुदुली यांची एकूण संपत्ती केवळ 15 हजार रुपये आहे.