विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. मात्र, अजून राज्याला विरोधी पक्षनेता (Opposition Leader) मिळालेला नाही. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे सध्या कॉंग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष बनला आहे. पण अजूनही कॉंग्रेसकडून (Congress) कोणाचीही विरोधी पक्षनेते पदासाठी वर्णी लागलेली नाही. असं असलं तरी या विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसमधले काही चेहरे सध्या चर्चेत आहेत. कोणाची नावं चर्चेत आहेत आणि कोणत्या नावांची शक्यता जास्त आहे, जाणून घेऊयात.
खरंतर अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची निवड होणं गरजेचं होतं, पण कॉंग्रेस हायकमांडने अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही, असं समजतंय. यामागे हायकमांडचा हेतू असा की, मागच्या काही काळात कॉंग्रेस इतकी सक्रिय नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी महाविकास आघाडीत सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेनेच्या तुलनेत कॉंग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचं दिसून आलं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी हायकमांड आता परीक्षा घेत असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजेच जो नेता राजकारणात जास्त अॅक्टिव असेल, अशा नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते पद कॉंग्रेसकडेच का?
शिंदे-फडणवीस सरकार असताना महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे अजित पवार हे विरोधी पक्षनेते बनले होते. पण नुकतंच पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं असतानाच अजित पवार गटाने राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळही कमी झालं. आधीच शिवसेनेतल्या बंडाने उद्धव ठाकरे यांच्याकडचं संख्याबळ कमी झालं आहे, तर आता राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबतही केवळ 15 आमदार असल्याची चर्चा आहे. पण काँग्रेसकडे मात्र 45 आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच, ‘ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त, विरोधी पक्षनेते पद त्यांचं’ या फॉर्म्युल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. पण काँग्रेस या पदासाठी कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
‘ही’ नावे चर्चेत
विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत बाळासाहेब थोरात यांचं नाव आघाडीवर आहे. थोरात हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सध्या ते काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आहेत. पण जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हापासून थोरात अधिकच अॅक्टिव मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांचंही नाव आघाडीवर आहे. दुसरं नाव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं आहे. चव्हाण हे सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पण, मागच्या काही महिन्यांपासून मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या.
शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे काही आमदार गैरहजर राहिले किंवा उशिरा पोहोचले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाचं भाषण करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याचं सांगत त्यांचे आभार मानले होते. त्यामुळे आता चव्हाणांवर विश्वास ठेवून त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवणार का हे पाहावं लागेल.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. नाना पटोलेंनी आतापर्यंत अनेकदा भाजपवर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही बऱ्याचदा निशाणा साधला आहे. शिवाय पटोले हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते मानले जातात. पण तरी कॉंग्रेसमधले काही जण त्यांच्या नेतृत्वावर नाराजही आहेत. पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यासाठी अनेक नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांची चर्चा केली होती, अशीही माहिती आहे. त्यामुळे पटोलेंकडे हे पद जाईल का हाही एक प्रश्न आहे.
विजय वडेट्टीवार, सुनिल केदार ही नावं सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत. याशिवाय कॉंग्रेसमध्ये महिला नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांच्या नावालाही पसंती मिळत असल्याचं दिसून येतं. तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व बाल विकास मंत्री होत्या. महिला नेत्यांपैकी एक आक्रमक चेहरा म्हणून ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी या अधिवेशनात सुद्धा त्यांनी मणिपूरमधील महिला अत्याचारावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कॉंग्रेसकडून महिला नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.