आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. वर्षानुवर्ष पुरुषांचं वर्चस्व राहिलेल्या राजकारणातही महिला (Women Politicians) आपला ठसा उमटवत आहेत. पण पुरुषांच्या तुलनेत महिला राजकारण्यांना आक्षेपार्ह भाषेचा सामना करावा लागतो. पुरोगामी महाराष्ट्रातही राजकारणी महिलांना चारित्र्य किंवा वैयक्तिक टीकांना सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं. आता हा मुद्दा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली, असं धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsat) केलं. पण हे विधान ठाकरेंच्याच एका माजी खासदाराचं विधान आहे, असंही त्यांनी म्हंटलं. त्यामुळे राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच संदर्भातील काही उदाहरणं पाहुयात.
ज्या महाराष्ट्रात प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्यासारख्या महिला नेत्या एकेकाळी महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्या ते देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती राहिल्या आहेत, त्याच महाराष्ट्रात महिलांना जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय का असा गंभीर प्रश्न सध्याच्या राजकारणावरून निर्माण झाला आहे. राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या त्यांच्या सौंदर्यामुळे राजकारणात पुढे गेल्या, असं आमदार संजय शिरसाटांनी म्हंटलं. तसंच हे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचंच जुनं वक्तव्य असल्याचा संदर्भही दिला. पण महिला त्यांच्या कर्तुत्वानं पुढे जाऊ शकत नाहीत का? स्त्रियांचं वर्चस्व पुरुषांना नको वाटतं का? असे काही प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.
राजकारणात पुरुषांच्या तुलनेत महिला नेत्यांचं काय स्थान?
राजकारण म्हंटलं की टीका आणि विरोधक आलेच. पण महिलांच्या बाबतीत ही टीका स्त्री जातीवरून होताना दिसते. फक्त प्रियांका चतुर्वेदीच नाहीत तर याआधीही महाराष्ट्रातल्या अनेक महिला राजकारण्यांवर टीकेचा भडीमार झाला आहे. अशीच काही उदाहरणं आपण पाहुयात. भाजपचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना बेताल वक्तव्य केलं. ‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा’, असं विधान पाटलांनी केलं.
सुप्रिया सुळे या एक स्त्री आहेत म्हणून त्यांना स्वयंपाक करा असं सहज म्हंटलं गेलं. याचाच अर्थ, स्त्रियांना किती गृहीत धरलं जातं नाही? मात्र याच सुप्रिया यांनी एक उत्कृष्ट संसदपटू अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तब्बल सातव्यांदा त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मग अशा स्त्रीला घरी जाऊन स्वयंपाक कर असं म्हणणं कितपत योग्यय? हा पण इथं सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे यांनी मात्र पत्नीची साथ देत अशा विचारसरणीला फटकारलं होतं, जे नक्कीच कौतुकास्पद आहे.
पुढे काही महिन्यांनी पुन्हा सुप्रिया सुळेंवर मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. पण एका महिला खासदाराला शिवीगाळ करणारे मंत्री इतर महिलांचा सन्मान कसा करणार असा सवालही त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला. तर याआधी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही जळगावमधल्या रस्त्यांची तुलना थेट खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. भरसभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे गुलाबरावही टीकेचे धनी झाले होते.
राजकारण आणि खाजगी आयुष्य
खरंतर राजकारणात सार्वजनिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य वेगळं ठेवलं जातं. पण स्त्रियांच्या बाबतीत खाजगी आयुष्यावरून राजकारण केल्याचं दिसतं. याचं उदाहरण म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. (Sushma Andhare) अंधारेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्या ‘फायरब्रॅंड नेत्या’ म्हणून ओळखू लागल्या. पण जशा त्या प्रकाशझोतात आल्या तसं एक दिवस अचानक त्यांच्या घटस्फोटित पतीला त्यांच्यासमोर आणलं गेलं. वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि अंधारेंना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधात घटस्फोटित पतीला उभं केलं गेलं, अशी चर्चा रंगली.
लग्न करणं, न करणं किंवा संसार टिकणं, न टिकणं हा त्या त्या नवरा बायकोचा खाजगी प्रश्न झाला, याचा सार्वजनिक स्तरावर काही संबंध नसतो. तसंच असे विषय चव्हाट्यावर आणणं ही आपली नैतिकताही नाही. पण तरी असं घडत असेल तर ते त्या स्त्रीला मानसिकरीत्या खचवण्यासाठी किंवा तिचा आत्मविश्वास घालवण्यासाठी केलं जातं, असं म्हंटलं जातं. कारण पुरुषांवरही अनेकदा असे वैयक्तिक वार केले जातात. पण त्याचा पुरुषांवर फारसा फरक पडत नाही. याउलट स्त्रियांना अशा गोष्टींमुळे फरक पडतो. हेच लक्षात घेऊन स्त्रियांवर इमोशनली वार केले जातात.
वैयक्तिक टीकांचा होणारा परिणाम
पुरुष नेत्यांवरही वैयक्तिक टीका होताना दिसतात. याचं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे. मुंडेंचं प्रकरणही बरंच गाजलं होतं. लग्न झालं असतानाही मुंडेंनी विवाहेतर संबंध ठेवले असल्याचं उघड झालं आणि त्यांनीही ते सहज मान्य केलं. पण याचा त्यांच्या राजकीय जीवनावर काहीच परिणाम झाला नाही. लोकांनी सुद्धा त्यांना सहज स्वीकारलं. “ठीक आहे, सगळेच करतात. पण त्यांनी ते मान्य केलं”, “हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे”, असं म्हणत लोकांनी याकडे कानाडोळा केला. तसंच शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांचा देखील एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. पण हेच जर एका महिला नेत्याच्याबाबतीत घडलं असतं तर? याच समाजाने तिला स्वीकारलं असतं? समाजही सोडा, तिच्या कुटुंबाने तरी स्वीकारलं असतं? नेत्या म्हणून तर दूर राहिलं पण एक माणूस म्हणूनही तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असता.
मधल्या काळात शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण या प्रकरणात प्रश्न विचारले गेले ते म्हात्रेंना किंवा माध्यमांसमोर त्याच आल्या. पण सुर्वेंनी मात्र मौन बाळगलं. यानंतर सुर्वेंनी पत्राद्वारे आपली भूमिका मांडली होती. पण माध्यमांसमोर ते आलेच नाहीत. या सगळ्यावरून राजकारणातही पुरुषप्रधान संस्कृती चालत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान होईल, असं वक्तव्य केलं होतं. “महिला-पुरुषांमध्ये फरक असतोच ना” असं म्हणत गोगावलेंनी वाद ओढवला होता.
प्रियंका चतुर्वेदींना त्यांच्या सौंदर्यावरून बोललं गेलं, तर मागे अंधारेंना त्यांच्या उंचीवरुनही बोललं गेलं होतं. इतकंच नाही तर एकदा संजय शिरसाटांनीही अंधारेंवर खालच्या भाषेत टीका केली होती. या सर्व उदाहरणांमुळे पुरुष राजकारण्यांचा महिला किंवा महिला नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की कसा आहे, याची प्रचिती येते. अगदी सर्वच पुरुष अशा विचारसरणीचे असतात असं नाही. पण जेव्हा एखादी नामांकित व्यक्ती, सेलिब्रिटी, राजकारणी किंवा एखाद्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती महिलांविषयी अशी विधानं करत असेल तर समाजाने काय आदर्श घ्यावा? असा प्रश्न पडतो.