मुंबई-गोवा महामार्गाच्या निमित्ताने मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या संथ गतीने चाललेल्या कामासंदर्भात मनसे रस्त्यावर उतरली असून त्यासाठी मनसेने जागर पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेचं नेतृत्व अमित ठाकरे (Amit Thackeray) करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) चिरंजीव आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अशी आतापर्यंत अमित ठाकरेंची ओळख आहे, पण आता यापुढे मात्र ते आपली नवी ओळख निर्माण करत आहेत का? मोठी उडी घेतायत का किंवा राज ठाकरे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या विचारात आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महीने शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या अनेक पक्ष वेगवेगळ्या सामाजिक मुद्यांवर आंदोलनं करताना दिसत आहेत, त्याविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. अशात मनसे सुद्धा खड्डे असो किंवा टोलनाके असो, आक्रमक झाल्याचं दिसतंय. या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अमित ठाकरे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी अमित ठाकरे तयार होत आहेत का आणि लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
अमित ठाकरेंची बदललेली भूमिका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. पण त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे मात्र आतापर्यंत शांत स्वभावाचे दिसले. थोडक्यात, राज यांना जहाल आणि अमित यांना मवाळ नेते म्हणून पाहिलं जातं. पण सुरुवातीपासून शांत स्वभावाचे दिसणारे अमित ठाकरे आता मात्र आक्रमक होताना दिसत आहेत. आता सुद्धा अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जागर पदयात्रा काढण्यात आली आहे. “ही यात्रा आता शांततेच्या मार्गाने निघाली असली तरी यापुढे ही यात्रा शांतेतत नसणार आहे. तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे ते करा”, असा थेट इशाराच अमित ठाकरेंनी सरकारला दिला. यामुळे आगामी निवडणुकीसाठी अमित ठाकरे तयार होत आहेत असं बोललं जातंय. म्हणूनच राज ठाकरे अमित यांना मैदानात उतरवणार का?अशा चर्चांना आता उधाण आलंय.
मागच्या काही दिवसांचा आढावा घेतला तर अमित ठाकरे सातत्याने चर्चेत आहेत. सिन्नर टोलनाक्याच्या तोडफोडीमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले. टोलनाक्याची तोडफोड झाल्यानंतर अमित सुद्धा वडिलांच्या पवलावर पाऊट टाकत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात “राजसाहेबांमुळे 65 टोलनाके फुटके आणि माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली” हे त्यांचं विधानही बरंच चर्चेत होतं. शिवाय यादरम्यान त्यांचा महाराष्ट्र दौरा सुद्धा सुरू झालेला, ज्यामुळे ते अॅक्टिव मोडमध्ये आल्याचं दिसलं. याआधी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत बोलतानाही सरकार आमदार फोडण्यात व्यस्त होते म्हणून इर्शाळवाडीकडे दुर्लक्ष झालं, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्यावेळी भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र “अमित हे राजकारणात नवीन आहेत. त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. ते आता शिकत आहेत”, असा पलटवार केला होता.
ठाकरे विरुद्ध ठाकरे (Thackeray Vs Thackeray)
दरम्यान, आता तर अमित यांनी पदयात्रा सुरू केली असून या माध्यमातून ते सरकारला धारेवर धरतानाही दिसत आहेत. इतकंच नाही तर सध्या ते सिनेटच्या निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. अमित यांना जर राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर मुंबई विद्यापीठाची निवडणूक अत्यंत गरजेचं असल्याचं सांगण्यात येतंय. पण सध्या मुंबई विद्यापीठावर शिवसेना ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंचं वर्चस्व मानलं जातं. आदित्य ठाकरेंनी सुद्धा आपल्या राजकारणाची सुरुवात इथूनच केली होती. त्यामुळे आता अमित ठाकरेंसाठी सुद्धा मनसे हीच रणनीती आखत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत पाहायला मिळेल. या सगळ्यामुळे अमित ठाकरे हे आगामी निवडणुकांसाठी तयार होतायत अशा चर्चांना बळ आलंय. त्यात ‘सिनेटच्या निवडणुकांसाठी आम्ही 100 टक्के तयार आहोत’ असं सांगणं काय पदयात्रा काढून सुरुवातीलाच सरकारला इशारा देणं काय, अमित ठाकरेंचं हे बदलेलं रूप बरंच काही सांगून जातंय.
विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे ही युवासेना आणि अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेचं प्रतिनिधित्व करतात. यामध्ये आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवून आमदारकी मिळवली, मग मंत्रीपद भूषवलं, इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनंतरचा एक प्रमुख चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आता पाहिलं जातं. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सुद्धा त्यांनी आक्रमकपणा भूमिका घेतली, अनेक सभा, मोर्चांचं नेतृत्व केलं, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात स्वतः सभा घेतल्या, भाषणं केली. पण अमित ठाकरेंना आजवर अशी संधी मिळाली नाही की ते पक्षाचं नेतृत्व करतील. राज ठाकरेंच्या सभांना, कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याखेरीज अमित ठाकरे पक्षात फारसे सक्रिय दिसले नाहीत. त्यामुळे आता त्यांना पक्षातून संधी दिली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल.