ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर (Dr. Mangala Narlikar) यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. मंगला नारळीकर यांना यापूर्वी देखील कॅन्सर हा रोग झाला होता. त्यातून त्या बऱ्या देखील झालेल्या, पण पुन्हा या आजाराने डोकं वर काढलं. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता. मात्र आज त्यांचा कॅन्सरसोबतचा लढा अखेर थांबला. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी पती जयंत नारळीकर यांची खंबीररित्या साथ दिली.
कोण होत्या मंगला नारळीकर? (Dr. Mangala Narlikar)
लग्नाआधी त्यांचं मंगला राजवाडे असं नाव होतं. 17 मे 1943 रोजी त्यांचा जन्म झाला होता. 1962 साली मुंबई विद्यापीठतून त्यांनी ‘बीए’ची पदवी घेतली. त्यानंतर 1964 साली गणित विषयात त्या एम.ए. झाल्या. त्यावेळी त्या विद्यापीठातून प्रथम आल्या. संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र हे डॉ. मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय होते.
पुढे 1965 रोजी मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या मंगला नारळीकरांच्या सासू होत्या, तर सासरे विष्णू वामन नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक होते.
लिहिलेली पुस्तके
शास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ यासह मंगला नारळीकर या एक लेखिका सुद्धा होत्या. त्यांनी इंग्रजी व मराठी भाषेतील अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ‘गणितगप्पा’, ‘गणिताच्या सोप्या वाटा’ यासारखी शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. तर ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसं’ हे प्रवासवर्णन पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.