अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याच योगदानामुळे यशस्वी होतांना दिसत आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. आज जिल्ह्यातील घोटी, तालुका इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यापीठावर राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे,यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
० ते ६ वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे असून सुपोषीत भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये मांडली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्ण श्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत विविध राबविलेल्या उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सेविका व मदतनीसांचे कौतुक केले. बालकांच्या शिक्षणाचा पहिला श्रीगणेशा हा अंगणवाडीतूनच होत असून अंगणवाडी सेविका त्यांचा पहिला गुरू आहे. मुल जन्मास येण्यापूर्वी व जन्मास आल्यांनतरही माता व बालक यांच्या पोषण आहाराची काळजी अंगणवाडी सेविका या जबाबदारीने पार पाडत आहे. कोरोना कालावधीतही हातात थर्मामीटर व ऑक्सीमीटर घेवून गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीत या सेविका अग्रेसर होत्या. स्त्री हा कुटूंबाचा कणा असून ती स्वत: सुदृढ असेल तर तिचे कुटूंबही सुदृढ राहते. डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पुढील वर्षापासून दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मतदनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय पोषण अभियानात अधिकाधिक उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही मंत्री कु. आदिती तटकरे यांनी यावेळी केले.
सचिव अनुप कुमार यादव म्हणाले की, पोषण हे सुदृढ आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. गरोदर महिलांना योग्य पोषण आहार दिल्यास जन्मास येणारे बाळ हे सुदृढ होते. सही पोषण, देश रोशन या ब्रीदवाक्याप्रमाणे गर्भधारणेपूर्वीच स्त्री ला उत्तम पौष्टीक आहार देल्यास सुपोषीत भारतची संकल्पना पूर्णत्वास जाण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. आयुक्त श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून अंगणवाडीसोबतच गावालाही सुपोषित करण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देतांना आहाराबाबत योग्य मार्गदर्शन झाल्यास निश्चितच फायदा होईल. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्ह्यात आयआयटी मुंबई यांच्या समवेत स्तनपान विषयक विशेष उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रभावी स्तनपान व प्रभावी पोषण कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
आदिवासी नृत्याने मंत्री महोदय व मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आहे तसेच शाळेतील मुलांच्या पोषण आहार दिंडीत मंत्री आदिती तटकरे व मान्यवर सहभागी झाले. राज्यस्तरीय पोषण माहचे मान्यवरांच्या हस्ते बलून हवेत सोडून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पोषण माह अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नाशिक, ग्रामीण रूग्णालय घोटी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, आय आय टी मुंबई यांच्याद्वारे उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली. कार्यक्रमात जिल्हा परिषद नाशिक महिला व बालविकास विभागाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण आणि बाला संकप्लनेतून मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी साकारलेल्या इमारतीच्या मॉडेलचे उदघाटनही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमात ६ महिने पूर्ण झालेल्या बालकांना अन्न प्रशान कार्यक्रम, गर्भवती माता कौतुक सोहळा, माझी कन्या भाग्याची अंतर्गत लाभार्थी यांना धनादेश वाटप, बेबी केअर किटचे वाटप, अंगणवाडी मतदनीस पदावरील नियुक्ती आदेश वाटप, महिला बचत गटांना कर्ज धनादेश वाटप, विशेष पुरस्कार आणि गुणवंत अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.