पुणे : काल राञी (दिनांक २७•११•२०२३) वेळ १२•४७ वाजता अग्निशमन दल Fire Brigade नियंत्रण कक्षात नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक गॅस असलेला टँकर पलटी Accident झाला असून मोठ्या प्रमाणात वायुगळती Ethylene Oxide होत आहे. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे Pune अग्निशमन दलाकडून मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळती होत होती. त्याचवेळी माहिती घेतली असता सदर वायु हा इथिलीन ऑक्साइड असल्याचे समजताच हा वायू ज्वलनशील व धोकादायक असून हा पाण्यात विरघळणारा असल्याने यावर सेकंदाचा ही विलंब न करता पाण्याचा फवारा करत सदर टँकरवर आग वा स्फोट होऊ नये म्हणून सातत्याने चारही बाजूने पाणी मारण्याचे कार्य जवानांनी सुरू केले. त्याचवेळी आजूबाजूचे असणारे हॉटेल्स तसेच इतर इमारती व रहिवाशी यांना सतर्क करण्यात आले.
सदर टँकर क्रमांक एमएच ०४ एफजे ७२४५ हा ५.५ बार प्रेशरने भरलेला ०८ टन इथिलीन ऑक्साइड हा अत्यंत धोकादायक वायु घेऊन रिलायंस पेट्रोकैमिकल्स कंपनी, नागोठणे, मुंबई येथून उस्मानाबाद येथे बालाजी कंपनी येथे निघाला होता. तसेच हा टँकर बालाजी रोड सर्व्हिसेस ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या मालकीचा होता. राञी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षामार्फत रिलायंस पेट्रोकैमिकल्स आणि बालाजी कंपनी यांना संपर्क साधून घटनेची माहिती देऊन ताबडतोब मदत पाठवण्यास सांगितले असता पहाटे सहाच्या सुमारास रिलायंस पेट्रोकैमिकल्सचे तज्ञ सेफ्टी ऑफिसर मिलिंद कुलकर्णी घटनास्थळी दाखल होऊन पुढे त्यांच्या पथकाने नायट्रोजन व क्रेनची मदत मागविली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास भैरवनाथ कंपनीच्या पंधरा टनाच्या दोन क्रेन व नायट्रोजन (१५ सिलेंडर) असलेला टेम्पो दाखल होऊन टँकर उभा करण्याचे कार्य सुरू केले व पुढे तासाभरात क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा केला व त्यानंतर नायट्रोजनच्या दाबाचा वापर करुन अपघातग्रस्त टँकरमधून वायु दुसरया टँकरमध्ये घेण्यात आला. यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचा मारा सातत्याने करीत होते. कारण जर यावेळी दुर्घटना घडली असती तर सदर परिसरात मोठी हानी झाली असती. या सर्व प्रक्रियेला सुमारे सोळा तासाचा अवधी लागला. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर अग्निशमन दलाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल व एमआयडीसी अशा एकुण १० वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या उपस्थितीमध्ये ०६ अग्निशमन अधिकारी तसेच सुमारे ७० ते ८० जवानांनी कामगिरी चोख बजावली.
“जणू कालची राञ वैरयाची होती, कारण इथिलीन ऑक्साइड हा वायू मोठ्या प्रमाणात ज्वलनशील असल्याने धोका फार मोठा होता. दलाचे अधिकारी व जवान यांनी परिस्थिती उत्तमरित्या हाताळली व शहरातील मोठी दुर्घटना टाळली तसेच रिलायंस पेट्रोकैमिकल्सचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस यंञणा व वाहतुक विभाग तसेच नागरिकांनी मोठे सहकार्य केले.”