Vasai-Virar : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालंय. सध्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे दोन विकृत मोकळे फिरत असल्याचं सांगितलं जात आहे. वसई-विरार मधील मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. हे विकृत रस्त्यात मुलींना अडवून त्यांना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून तुळींज पोलिसांनी दोन विकृत आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे. (serial rapist in vasai virar police search)
दोन घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण
नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली.
यामध्ये अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. या मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकरणांत दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथके बनवली आहेत. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यांची माहिती देणार्यास बक्षिस जाहीर करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगरकर यांनी दिली. पालकांनी आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
देशात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. हे विकृत लवकरच सापडले पाहिजे व त्यांना योग्य शिक्षा देऊन या प्रकरणांना आळा घालायचे काम सुरु आहे.