जर एखादा पुरुष सिगारेट ओढताना दिसला तर तुम्हाला यात काही नवल वाटेल का? बिलकुल नाही… पण जर एक महिला त्या पान टपरीच्या बाजूला सिगारेट ओढताना दिसली तर तिचं चरित्र काही ठीक नाही, असा ठपका लावून मोकळे होतो…किंवा तिच्या चारित्र्यावर टीका टिप्पणी करतो… पण आता सुप्रीम कोर्टाने अशा रूढीवादी शब्द आणि विचारात बदल घडवून एक नवी हॅण्डबूक जरी केलीय. न्यायालयीन सुनावणी दरम्यान महिलांविरुद्ध रूढीवादी भावनांना बळकटी देणारे शब्द वापरण्यावर आळा बसावा या उद्देशाने ही नवी हॅण्डबुक तयार केलीय. इंग्रजीत अशा शब्दांना ‘जेंडर स्टीरियोटाइप’ म्हणतात. काय आहे ही हॅण्डबुक जाणून घेऊयात….
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस डी.व्हाय. चंद्रचूड़ यांनी ही हॅण्डबुक जारी केलीय. ८ मार्च २०२३ ला जागतिक महिला दिनी सर्वोच्च न्यायालयाने येत्या काळात कायदेशीर बाबींमध्ये महिलांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यास मनाई असेल व यासाठी सर्वोच्च न्यायालय पुढाकार घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाने क्रांतिकारी पाऊल उचलत यावर ही हॅण्डबुक जरी केलीय. अनेक पिढ्यांपासून रूढ झालेले नेहमीच्या वापरातील शब्द जे महिलांवर खूप अन्यायकारक ठरत होते ते बदलून आता लिंगाधारित समानता आणणारे शब्द या पुढे न्यायालयात वापरले जातील. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील न्यायालयांसाठी प्रकाशित केलेली हॅण्डबुक सरन्यायाधीश डी.व्हाय. चंद्रचूड़ यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य, कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती प्रतिभा सिंह आणि प्राध्यापक झुमा सेन यांनी गेली दोन वर्ष या विषयावर काम करून ३० पानांची शब्दावली तयार केलीय. एखादे निकालपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशांमध्ये स्त्रीयांचा तुच्छतेने उल्लेख होऊ नये त्या अनुशंगाने काही शेलके शब्द काढून टाकण्याचे निर्देश न्यायालयाने या हॅण्डबुकमध्ये नमूद केले आहेत. खरतर आपल्या समाजात न्यायाधीशांना खूप आदराचं स्थान दिलेलं आहे. समाज सुध्दा न्यायव्यवस्था आणि न्यायालयांकडे मार्गदर्शक म्हणून पाहत असतो आणि म्हणूनच या हँडबुक मधून आपल्या न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता लक्षात येते असे म्हणता येईल. या हॅण्डबुकमुळे भेदभाव करणारे शब्द तसंच स्त्रीयांना दुय्यम वागणूक देणारे शब्द ओळखणं आणि त्यांचा वापर थांबवणं आता शक्य होईल, असा विश्वास सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांनी व्यक्त केलाय.
मुळात असे कोणते शब्द आहेत, ते देखील समजण्यास मदत होणारेय. लैंगिक भेदभाव, विशेषत: महिलांसाठी वापरलेले अपमानास्पद व अन्यायकारक शब्दांची यादी तर आहेच पण त्या शब्दाऐवजी कोणते शब्द वापरता येतील याचीही यादी या हँडबुकमध्ये दिलीय. तसेच काही शब्द असेही आहेत जे देशातल्या न्यायालयांनी या आधी वापरले आहेत. नक्की कोणत्या शब्दांवर बंदी आणली आहे आणि कोणते पर्यायी शब्द वापरले जाणार आहेत या यादीतील काही महत्वाचे शब्द पाहूयात…..
- अडल्टरनेस – विवाहबाह्य एखाद्या स्त्रीशी किंवा अन्य कोणाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं
- अफेअर – विवाहबाह्य संबंध
- बास्टर्ड किंवा अनैतिक – ज्याच्या आईवडिलांनी लग्न केलं नाही अशा पालकांचं मूल
- बायलॉजिकल सेक्स/बायलॉजिकल पुरुष – जन्माच्या वेळी जे लिंग होतं
- बॉर्न अ गर्ल/बॉय – जन्माच्या वेळी मुलगा किंवा मुलगी
- करियर वुमन – वुमन किंवा महिला.
- कार्नल इंटरकोर्स – सेक्शुअल इंटरकोर्स
- चेस्ट वुमन किंवा वर्जिन महिला – महिला
- चाईल्ड प्रॉस्टिट्यूट- ज्या मुलांची तस्करी केली गेली आहे
- ड्युटीफुल वाईफ, गुड वाईफ – पत्नी
- हाऊसवाईफ – होममेकर
- इंडियन वुमन/वेस्टर्न वुमन – महिला
- ट्रान्ससेक्शुअल – ट्रान्सजेंडर
- अनवेड मदर म्हणजे अविवाहित आई – आई
- स्पिन्स्टर – अविवाहित महिला
- फगट – जी व्यक्ती जशी आहे तसाच त्याचा उल्लेख करावा- उदा. होमोसेक्शुअल किंवा बायसेक्शुअल
- मॅरेजेबल एज म्हणजे विवाहयोग्य महिला – कायदेशीररित्या लग्नायोग्य वय असलेली महिला
या हँडबुकमध्ये ‘न्यायाधीशांसाठी मार्गदर्शक’ असा उल्लेख करण्यात आला असला तरी केवळ न्यायाधीशांसाठीच नाही तर संपूर्ण न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने ज्यामध्ये न्यायाधीश, वकील या सगळ्यांचा समावेश होतो, या सगळ्या घटकांना फायदा पोहोचवणारी ही हँडबुक आहे. त्यामुळे केवळ शब्दच नाही तर महिला आणि इतर लिंगभाव असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत विचार करण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी न्यायालयाने एक पाऊल पुढे टाकलय. त्यापाठोपाठ आता समाजानेही हा विचार आत्मसात करण्याची गरज आहे.