राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला कधीही एकहाती सत्ता मिळवता आली नाही, अशी चर्चा रंगली आहे. “ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, जगनमोहन रेड्डी किंवा मायावती हे सर्व स्वतःच्या जीवावर सत्ता आणून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. असं असूनही राष्ट्रवादी कधी आपल्या स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकली नाही”, असा मुद्दा शरद पवारांचे पुतणे व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तर आता अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील यांनी देखील तोच कित्ता गिरवला. महाराष्ट्राच्या राजकारणातील मास्टरमाइंड आणि चाणक्य अशी ओळख असलेल्या पवारांना राज्यात एकहाती सत्ता का मिळवण्यात आली नाही? यामागे असलेल्या कारणांपैकी 5 प्रमुख कारणं जाणून घेवूया.
महाराष्ट्रात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ही प्रमुख राजकीय पक्ष मानली जातात. त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून हा पक्ष बराच काळ सत्तेत राहिला आहे. पण तरी राष्ट्रवादीला कधीही एकहाती सत्ता काबीज करता आली नाही, असं वारंवार म्हंटलं जातं. पक्षातील नेते सुद्धा ही खंत व्यक्त करतात. आताही मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांच्या राजकारणावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 60 ते 70 आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मायावती यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. पण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही”.
‘या’ 5 कारणांमुळे राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवता आली नाही
वळसे पाटलांच्या या वक्तव्याने पुन्हा राजकारणात विशेषतः राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. पण वळसे पाटलांनी सांगितलेल्या या वास्तवामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. जसं की अंतर्गत फूट, गटबाजी किंवा अजूनकाही. पण त्यापैकी 5 प्रमुख कारण आपण पाहणार आहोत. पहिलं कारण म्हणजे गेल्या काही काळापासून राज्यात प्रादेशिक पक्षांचा दबदबा वाढत चालला आहे. शिवसेना, मनसे, बहुजन विकास आघाडी, शेकाप यांसारख्या पक्षांचा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किंवा जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. शिवाय राज्यात भाजप आणि कॉंग्रेससारखी दोन मोठी राष्ट्रीय पक्ष आहेतच. त्यामुळे या स्पर्धेत राष्ट्रवादीला एकट्याने सत्ता मिळवणं कठीण बनतं.
दुसरं कारण म्हणजे मतदारवर्ग. सुरुवातीपासूनच मराठा समाज हा राष्ट्रवादीचा मतदारवर्ग असल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादीचे बहुतांश नेतेही मराठा समाजातून येतात. शिवाय राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष आहे, त्यामुळे ओबीसी, मुस्लिम आणि दलित समाजालाही पक्षातून संधी दिली जाते. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, धनंजय मुंडे ही त्यापैकीच काही उदाहरणं. मात्र सुरुवातीला हा मतदारवर्ग काँग्रेस पक्षाचा मानला जायचा. पण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीने हा मतदारवर्ग विभागला गेला. तर आता मराठा समाज राष्ट्रवादीकडून काही अंशी दूर झाल्याचं बोललं जातं. याला कारण म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी भाजपने मराठा नेतृत्वाला दिलेली संधी आणि इतर पक्षातून अनेक मराठा नेत्यांनी भाजपात केलेला प्रवेश. त्यामुळे राष्ट्रवादीचा मूळ मतदार दुरावला, असंही सांगण्यात येतं.
तिसरं कारण म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झालेले घोटाळ्याचे आरोप. शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, लवासा, तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा यासारख्या प्रकरणांमुळे राष्ट्रवादी कायमच अडचणीत आली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सुद्धा अनेकदा आरोप झाले आहेत. पक्ष नेतृत्वापासून नेत्यांपर्यंत अनेकांवर झालेल्या आरोपांमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो आणि निवडणुकीवेळी त्याचा प्रत्यय येतो.
चौथं कारण म्हणजे अविश्वास. पुलोद सरकार असो किंवा हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत केलेली युती असो, यासारख्या घटनांमुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत कायमच संभ्रम निर्माण होतो. राष्ट्रवादी कधीही कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकते, असं त्यांच्याविषयी बोललं जातं. पक्षाचे विचार आणि धोरणांमध्ये बदल होत गेले की कार्यकर्ते आणि जनता दोन्ही संभ्रमात जातात. तसेच पक्षावर असलेला विश्वासही कमी होतो. शिवाय कार्यकर्त्यांची पक्षावर असलेली निष्ठा सुद्धा कमी होऊ लागते. ज्यामुळे त्यांची सक्रियता कमी होते.
पाचवं कारण म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शरद पवार स्वतः. पवार महाराष्ट्रातून दिल्लीत गेले आणि तिथेच ते रमले. त्यांनी अनेकदा आपल्याला दिल्लीत राजकारणच करायचं असल्याचं सांगितलं. पण शरद पवार केंद्रात सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातली त्यांची पकड ढिली पडत गेली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र की दिल्ली असं विचारण्यात आलं असता त्यांनी “दिल्ली सोडणार नाही” असं उत्तर दिलं. महाराष्ट्र सुरक्षित हवा असेल तर दिल्ली हातात असणं गरजेचं आहे, असं सांगणाऱ्या पवारांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचं अनेक जाणकार सांगतात. या 5 प्रमुख कारणांमुळेच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवता आली नाही, असं म्हणता येईल.








