महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांचे धाकटे चिरंजीव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री होणार अशा बातम्या नेहमीच येत असतात. मात्र आजपर्यंत तरी तेजस ठाकरेंनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेला नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या ट्वीटमुळे आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण तेजस ठाकरे खरंच राजकारणात येऊ शकतात का? तसेच त्यांच्याविषयी माहिती घेऊयात.
सोमवारी (7 ऑगस्ट) तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. सोबतच तेजस यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक संकेतही दिले. “निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार!”, असं पेडणेकरांनी ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.
कोण आहेत तेजस ठाकरे? (who is Tejas Thackeray)
खरंतर याआधी देखील पेडकरांनी तेजस यांचं कौतुक करत त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. पण तेजस ठाकरेंना मात्र राजकारणापेक्षा वन्य जीवसृष्टीमध्ये अधिक रुची आहे. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. उद्धव ठाकरेंप्रमाणेच त्यांना प्राण्यांची आवड आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपली ही आवड जोपासत काही प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी साप आणि खेकड्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. खेकड्यांच्या प्रजातीपैकी एका प्रजातीला त्यांनी आपल्या ‘ठाकरे’ आडनावावरून नाव दिलं आहे.
तेजस ठाकरे म्हणजे बाळासाहेबांची छबी
शिवसेनेत बंड झालं त्यावेळी आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद देण्यात यावं आणि तेजस ठाकरेंकडे युवासेनेची धुरा सोपवावी, अशी मागणी पक्षातून होत होती. तेजस ठाकरे हे जर ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर पक्षाला फायदा होऊ शकतो, असं काहींचं म्हणणं आहे. कारण तेजस हे आक्रमक स्वभावाचे आहेत. स्वतः बाळासाहेबांनी आपल्या एका भाषणात तेजस ठाकरेंची ओळख करताना आपल्या स्वभावात साम्य असल्याचं सांगितलं होतं. “आदित्य हा शांत आणि संयमी आहे, तर तेजस माझ्यासारखा गरम डोक्याचा आहे”, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल?
त्यामुळे तेजस यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला तर ठाकरेंना एक नवीन आक्रमक चेहरा मिळेल. तसेच ते ‘ठाकरे’ असल्यामुळे शिवसैनिकांना आणि युवा पिढीला त्यांच्याविषयी आकर्षण असू शकतं. त्यामुळेच त्यांनी राजकारणात यावं, अशी मागणी युवासेनेकडून होत असते. शिवाय शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देवू शकतात, असं काही राजकीय विश्लेषक सांगतात.
तेजस यांचे थोरले बंधू आदित्य ठाकरे यांचा राजकारणात सक्रिय सहभाग आहे. मात्र तेजस यांनी कधीच राजकारणात प्रवेश केला नाही. पण आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी त्यांच्या प्रचारात तेजस यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव त्यांच्या भेटीला आले होते. तेव्हा त्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह तेजस ठाकरेही उपस्थित होते. तेव्हा सुद्धा त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या. यानंतर शिवसेनाफुटीवेळी देखील तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली होती. तेजस ठाकरे राजकारणापासून तसे दूर असले तरी अनेकदा राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. त्यामुळेच त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगताना दिसतात.