मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आणि त्यांची मनसे ही त्यांच्या स्टाईलने देशभरात प्रसिद्ध आहे. मनसे स्टाईल आंदोलन म्हंटलं की डोळ्यासमोर चटकन उभं राहतं ते म्हणजे टोलनाके बंद करणं किंवा टोलनाके फुटणं. (toll plaza protest) आता या टोलनाक्यांचा विषय पुन्हा बाहेर आला आहे तो त्यांच्या चिरंजीवांमुळे. “राज ठाकरेंमुळे 65 टोलनाके बंद झाले, तर माझ्यामुळे आणखी एक बंद झाला”, असं अमित ठाकरे सहज बोलून गेले आणि प्रश्न उद्भवला की राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर खरंच किती टोलनाके बंद झाले? याच प्रश्नाचं उत्तर समजून जाणून घेऊयात.
मनसे आणि त्यांचं टोलनाक्यांचं आंदोलन हे आता एक समीकरणच बनलं आहे. पण या आंदोलनात एकूण 65 टोलनाके बंद झाले आहेत, असा दावा स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी केला आहे. यात आणखी एका टोलनाक्याची भर पडली आहे, ती समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याने. अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त ते नाशिक निघाले होते. पण वाटेत समृद्धी महामार्गावरील गोंदे टोल नाक्यावर त्यांची गाडी ही 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आली. तेही फास्ट टॅग असतानाही. यावर टोल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, फास्टटॅग ब्लॅक लिस्टेड असल्याने तो स्कॅन होत नव्हता. तर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी गैरव्यवहार केला असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.
मनसेचा ‘खळळ-खट्याक’ (MNS Raj Thackeray)
घडल्या प्रकारानंतर अमित ठाकरे नाशिकला हॉटेलवर पोहोचले आणि इथे टोलनाका फुटला. ठाकरेंना अडवल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलनेच टोलची तोडफोड केली. पण मनसेने टोलनाके फोडणं ही काय पहिलीच घटना नाही आहे. राज ठाकरेंच्या मनसेचा ‘खळळ-खट्याक’ शब्द अमित ठाकरेंच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला. यावेळी “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद पडले आणि माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली” अशी कबुली अमित ठाकरेंनी दिली. पण खरंच ६५ टोलनाके बंद झालेत का? कारण याआधी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील राज्यातील 65 टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाल्याचा दावा केला होता.
राज ठाकरेंना झाली होती अटक (Raj Thackeray arrested for vandalizing toll plaza)
मनसेची स्थापना होऊन 17 वर्ष झालीत, या 17 वर्षात मनसेनं अनेक आंदोलनं केली आहेत. पण त्यापैकी गाजलेलं आंदोलन म्हणजे टोलनाक्यांचं. साधारणतः 2011-12 च्या कालावधीत मनसेने टोलविरोधी आंदोलन सुरू केलं होतं. टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा झोल होतो, असा आरोप मनसेकडून होऊ लागला. त्यामुळे टोलनाके बंद करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलं. कालांतराने हे आंदोलन थंडावलं. मात्र 2014 मध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक टोल नाक्यांची तोडफोड सुरू केली. वाशी, ठाणे, कारेगाव, घोडबंदर, ऐरोली आणि कल्याण-डोंबिवलीमधले टोलनाके फोडण्यात आले. ज्यासाठी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटकही झाली. इतकंच नाही तर स्वतः राज यांना सुद्धा अटक झाली होती.
वाशी टोलनाका फोडल्या प्रकरणी राज यांना अटक झाली होती. त्यानंतर 2014 मध्येच कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मुंबईबाहेरचे 44 टोल नाके बंद करण्यात आले, त्यानंतर शिवसेना-भाजप यांचं सरकार आलं आणि 12 मोठे टोलनाके बंद झाले. पण याचं श्रेय हे मनसेचं असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणातही त्यांनी महाराष्ट्रातले 60 हून अधिक टोलनाके बंद केल्याचा दावा केला होता. मनसेने टोलनाक्यांविरोधात आंदोलन सुरू केलं असलं तरी आजही राज्यात अनेक ठिकाणी टोलनाके सुरूच आहेत. त्यामुळे मनसेचं आंदोलनही अर्धवट राहिलं. खरंतर मनसे नेहमीच आपलं आंदोलन अर्धवट सोडते असा आरोप केला जातो. पण मागच्या वर्षी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात “माझ्या हातात सत्ता द्या, मग बाकीचे टोलही बंद करतो” असं म्हंटलं. त्यामुळे भविष्यात कधी मनसे सत्तेत आली तर टोलनाके पूर्णपणे बंद होणार का हे तेव्हाच समजेल.