इंदापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात सर्वच नेते सभा घेत आहेत. इंदापुरातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
इंदापुरातील महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उपस्थित त्यांना संबोधित करत असताना संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधत म्हटले आहे की, तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा, धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे ठाण्यात यायचं आहे..! ” असा टोला राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ” आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचाराने बसलेले आहात. इंदापूरला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मला येता आले. एक गोष्ट इथे स्पष्ट दिसते आहे की, पाया खालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले की मोदींचा मार्ग सुरू होतो. ” अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.