देशातील श्रीमंत राजकारण्यांपैकी एक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहिलं जातं. राजकारणात प्रवेश केल्यापासून प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अजित पवार यांच्या बंडाची बातमी आली, तेव्हा प्रफुल्ल पटेल देखील त्यात सहभागी असतील असा कुणी विचारही केला नसेल, इतके ते पवारांच्या विश्वासातले होते. पण शपथविधीच्या कार्यक्रमात तेही राजभवनात दाखल झाल्याने अनेकांना नवल वाटलं.
राष्ट्रवादीत संघर्ष असल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत, आमच्या पक्षात कोणतीही फूट नाही. शरद पवार हेच कायम सर्वेसर्वा असतील.
असं ठामपणे प्रफुल्ल पटेल यांनी काहीच दिवसांपूर्वी म्हंटलं होतं. मात्र त्यांच्या बदलेल्या भूमिकेमुळे पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येतंय. इतकंच काय तर स्वतः शरद पवारांसाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय.
राष्ट्रवादीत दुसऱ्या क्रमांकाचं पद
काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची निवड झाली. पटेल यांच्याकडे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आलं. अजित पवारांपेक्षा पटेल यांना हे पद दिलं गेलं यावरून पटेल पवारांच्या किती विश्वासातले होते याची प्रचिती येते.
कोण आहेत प्रफुल्ल पटेल? (Who is Praful Patel)
प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 मध्ये कोलकता येथे झाला. त्यांचे वडील मनोहर पटेल, जे एक उद्योगपती आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी सुद्धा होते. मनोहर पटेल महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते. तर यशवंतराव हे शरद पवारांचे गुरू होते. ज्यावेळी पवार यशवंतराव आणि मनोहर पटेल यांना भेटत असत तेव्हा तिथे शाळकरी अवस्थेतील प्रफुल्ल पटेल सुद्धा असायचे. यामुळे प्रफुल्ल यांचा राजकारणाशी जवळचा संबंध आला. तसंच पवारांसोबतचे संबंधही घट्ट होत गेले. (Praful Patel family)
राजकीय प्रवास (Praful Patel political journey)
प्रफुल्ल पटेल 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पुढे प्रफुल्ल यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1985 मध्ये ते गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले आणि इथून त्यांची राजकीय घोडदौड सुरू झाली. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा राजकीय प्रवास सुरु होता. यानंतर 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले.
पुढे 1996 आणि 1998 साली ते 11व्या आणि 12व्या लोकसभेवर पुन्हा निवडून गेले. यानंतर 2009 मध्ये ते चौथ्यांदा 15 व्या लोकसभेवर निवडून आले होते. तर 2000, 2006 आणि 2022 साली ते राज्यसभेवर निवडून आले. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात देखील त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत.
शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा देखील प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची साथ सोडली नाही. पवारांच्या सोबतच पटेल राष्ट्रवादीत आले. 1999 साली लोकसभा लढवली मात्र त्यात त्यांना विजय मिळाला नाही.
प्रफुल पटेल 1991-1996 पर्यंत देशाचे केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री होते. तर 2004 ते 2011 दरम्यान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये पटेल यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून काम केले आहे. पटेल यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात देशांतर्गत विमान सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक 40 टक्क्यांहून 49 टक्क्यांवर पोहोचली होती.
नंतरच्या काळात अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून पटेल कॅबिनेट मंत्री बनले. या व्यतिरिक्त 2009 ते 2022 पर्यंत ते भारतीय फुटबॉल फेडरेशनचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले होते. मात्र, 2022 साली या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं.
पटेल यांच्या नाराजीचं कारण काय?
शरद पवारांना गुरू मानणाऱ्या पटेल यांनी त्यांचाच नेतृत्वाखाली आपला राजकीय प्रवास सुरू केला. तसंच राजकारणात आपलं एक स्थान निर्माण केलं. मग आता पवारांच्या सर्वात कठीण काळातच त्यांची साथ का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजित पवारांच्या बाजूने गेल्यानंतरही पटेल पवारांनाच आपला गुरू म्हणत आहेत. असं असतानाही त्यांनी वेगळी वाट धरली म्हणजे ईडी व आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया हेच यामागे कारण असू शकतं, असं काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
गेल्या वर्षी पटेल यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली होती. त्यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई करण्यात आली. तर अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत पटेल यांचा व्यवहार झाल्याचे देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. ज्यामुळे पटेल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या कारवायांच्या तावडीतून सुटण्यासाठीच त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबला, अशी चर्चा आहे.