महाराष्ट्रात अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसाने रौद्र रूप धारण केलंय. गेल्या 2 दिवसांपासून उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. राजधानी दिल्लीत तर यंदाच्या पावसाने ४१ वर्षांचा विक्रम मोडलाय. दिल्लीत पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करून त्यांना जागेवर हजर राहण्यास सांगितले आहे.
कोणत्या राज्यांमध्ये पाऊस?
दिल्लीसह पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं यंदाची अमरनाथ यात्रा देखील काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे पुढे ढकलावी लागली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत.
मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे पडणे आणि वीज पडून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक ११ मृत्यू झाले आहेत. याशिवाय यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये ६, दिल्लीत ३, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या मंडीत बियास नदीच्या प्रवाहात ४० वर्षे जुना पूल वाहून गेला आहे.
राजधानी दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम तुटला
आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग वेधशाळेत रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 153 मिमी पावसाची नोंद झाली, जी 25 जुलै 1982 रोजी एका दिवसात झालेल्या 169.9 मिमी पावसानंतरची सर्वाधिक आहे. अधिकाऱ्यानुसार, शहरात 10 जुलै 2003 रोजी 133.4 मिमी, 28 जुलै 2009 रोजी 126 मिमी आणि 8 जुलै 1993 रोजी 125.7 मिमी पावसाची नोंद झाली होती. 21 जुलै 1958 रोजी येथे सर्वाधिक 266.2 मिमी पाऊस पडला होता.
पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
पावसामुळे उत्तर रेल्वेने १७ गाड्या रद्द केल्या आहेत. १२ गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाने रस्ते ढिगाऱ्यात बदलले आहेत, तर राजधानी दिल्लीसह सपाट राज्यांतील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दिल्लीतील यमुनेचे पाणी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.
पंजाबमधील अनेक भागात ट्रॅकवर पाणी साचल्याने अंबालाहून उना-अंब-दौलतपूर चौकाकडे येणाऱ्या वंदे भारतसह अन्य गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. श्रीखंड महादेव यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सहा इंच पाणी पडले आहे. दुसरीकडे, झुंझुनू आणि सीकरमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंजाब, हिमाचलचे मुख्यमंत्री आणि दिल्ली जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरशी बोलले आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. हिमाचलमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यापासून मोठा विध्वंस झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा मंडी आणि कुलू येथे ढगफुटीमुळे बियास नदीत अचानक पाणी वाढले, त्यात तीन पूल, एक एटीएम आणि चार दुकाने वाहून गेली. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत अतिवृष्टीबाबत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची रविवारची सुटी रद्द करून त्यांना फिल्डवर राहण्याचे निर्देश दिले होते.