केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु केल्याचं दिसत आहे. समान नागरी कायदा देशात सर्वत्र लागू करण्यात यावा का नाही? याबाबत सरकारने सूचना मागवल्या आहेत. २२ व्या विधी आयोगाने एक परिपत्रक काढून मान्यताप्राप्त धार्मिक संघटना आणि जनतेकडून समान नागरी कायद्याबाबत सूचना मागवल्या आहेत.(Uniform civil code law commission) १४ जून रोजी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. पुढील ३० दिवसांत याबाबतच्या सूचना देता येणार आहेत.
समान नागरी कायद्याचा इतिहास (Uniform Civil code history)
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. संविधानातील अनुच्छेद ४४ मध्ये देशासाठीची मार्गदर्शक तत्वे नमुद करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी राज्याने विशेष प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले आहे.
समान नागरी कायदा भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख अश्वासनांपैकी एक आहे. गेली कित्येक वर्षे देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबतची चर्चा सुरु आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपचं सरकार आल्यानंतर २०१६ मध्ये समान नागरी कायद्या संबंधित हालचाली झाल्या होत्या. त्यावेळी देखील जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये २१ व्या विधी आयोगाने समान नागरी कायदा लागू करणे योग्य नाही, त्याची सध्या गरज नाही, असे निरीक्षण नोंदवले होते. प्रत्येक धर्मातील कौटुंबिक कायद्यात सुधारणा करण्यात यावी, असे देखील या आयोगाने सुचवले होते. काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी मात्र समान नागरी कायद्याला विरोध दर्शवला आहे.
देशात समान नागरी कायदा असावा या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. वारसाहक्क, उत्तराधिकारी, दत्तक घेणे याबाबत एक कायदा असावा असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. ऑक्टोबर २०२२ मध्ये या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात देशात समान नागरी कायदा असायला हवा, असे सांगण्यात आले होते. २२ व्या विधी आयोगासमोर समान नागरी कायद्याबाबतचा विषय ठेवण्यात येईल, असे देखील सरकारने त्यावेळी सांगितले होते. त्यानूसार आता २२ व्या विधी आयोगाकडून या कायद्याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
समान नागरी कायदा काय आहे?(What is Uniform Civil Code)
समान नागरी कायदा म्हणजे देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकच समान कायदा. विवाह, वारसाहक्क, घटस्फोट अशा गोष्टींसाठी सर्वधर्मियांसाठी एकच नियम लागू करणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा. हा कायदा देशभरात लागू झाल्यास प्रत्येक भारतीय नागरिकाला मग तो कुठल्याही धर्माचा, वंशाचा, जातीचा असेल त्यास लग्न, घटस्फोट, वारसाहक्क याबाबत एकाच कायद्याचे पालन करावे लागले. धार्मिक रुढी, परंपरा यानूसार वेगळा नियम कोणालाही असणार नाही.
भारतात विवाहासंदर्भात प्रत्येक धर्माचे स्वतंत्र कायदे आहेत. हिंदू, जैन, बोद्ध धर्मीय हिंदू विवाह कायद्याचे पालन करतात, तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी वेगळे कायदे आहेत.
समान नागरी कायदा भारतात लागू झाला तर काय परिणाम होईल?
हा कायदा जर भारतात लागू झाला तर लग्न, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, मुलाची कस्टडी मिळवणे, प्रॉपर्टी वाटप आदी विषयावर नागरिकांना भारतात समान कायदा असेल. हा कायदा लागू झाला तर मुस्लिम, हिंदू, शीख, जेन, बोद्ध, इसाई,सर्व धर्मियांना त्याच्या धर्माचे नियम सोडून केंद्रात चालणारे नियम मानावे लागतील.
समान नागरी कायदा देशात कुठे लागू आहे?
भारतात हा कायदा सध्या फक्त गोवा या राज्यात लागू आहे. गोव्यातील समान नागरी कायदा Goa Uniform Civil Code या नावाने ओळखला जातो. १८६७ च्या पोर्तुगीज सिव्हिल कोडपासून हा कायदा तयार करण्यात आला आहे. गोवा मुक्त झाल्यापासून त्या राज्यात हा कायदा लागू आहे. गोव्यातील एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या अल्पसंख्यांक समुदायाची आहे. गोव्यात २७ टक्के ख्रिश्चन आणि ५ ते ६ टक्के मुस्लिम समुदाय राहतो.
समान नागरी कायद्याबाबत तुम्हाला सूचना कशा देता येईल?
समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिविल कोड (UCC) वर मत घेण्यासाठी एक लिंक तयार केलेली आहे. त्या लिंकवर क्लीक करून भारतीय नागरिक स्वतःचे मत मांडू शकता.(uniform civil code public opinion) ही लिंक केवळ ३० दिवसासाठी सुरु राहणार आहे. तरी सर्व भारतीयांनी ३० दिवसाच्या आत सूचना कळवायच्या आहेत.
https://legalaffairs.gov.in/law_commission/ucc/ ही समान नागरी कायद्याबाबत सूचना जाणुन घेण्यासाठी तयार केलेली लिंक आहे. २२व्या विधी आयोगाद्वारा निर्मित ऑफिशिअल आयडी membersecretary-lci@gov.in वर ही तुम्ही संबंधित काही सूचना पाठवू शकता.
सर्व प्रथम लिंक वर मत देणाऱ्याची संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. हि माहिती भरल्या नंतरच तुमचं मत हे ३ हजार शब्दाच्या आत किंवा २ एम.बी. पर्यंतच्या PDF फाईलमध्ये मांडून लिंक वर उपलोड करता येईल.